Thursday, April 16, 2009

प्रश्न.. प्रश्न आणि प्रश्न....

किती प्रश्न पडत असतात आपल्याला? त्यातल्या किती प्रश्नांची उत्तरं मिळतात?, मिळू शकतात? ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्यांचा पाठपुरावा का नाही करत आपण पुरेसा? आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ती कशी मिळतात?- आपण विचार करतो त्यातून? काहीबाही वाचतो त्यातून?, कुणाशी ठरवून बोलतो त्यातून?, ठरवून प्रयत्न करतो त्यातून?, आधीच्या स्वतःच्या अनुभवांचा आधार घेतो त्यातून की दुसर्यांचे ऐकलेले, पहीलेले अनुभव असतात त्यातून? यातल्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे बहुदा. थोड्याफार प्रमाणात हे सगळंच वापरतो आपण. एखाद्या वेळी 'युरेका' म्ह्टल्यासारखं उत्तर समोर दिसतं - कुणाच्या बोलण्यातून, कृतीतून किंवा पुस्तकातून. अनेकदा जुन्या- न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं अनापेक्षितारित्या मिळतात. मग तो प्रश्नं सुटला म्हणताना त्या निमित्तानं आणखी प्रश्न पुढे येतात आणि येतच रहातात- चक्र असल्यासारखे न थांबता..

जे प्रश्न सुटत नाहीत त्यांचं काय करतो आपण? करतो का पाठपुरावा? नवा, अधिक महत्त्वाचा किंवा कदाचित अधिक अवघड प्रश्न समोर आला की जुन्या प्रश्नाकडे थोडं दुर्लक्ष होणं गृहीतच आहे का? मग त्या अनुत्तरित प्रश्नांच काय? 'प्रश्न पडणं ही केवळ एक घटना आहे का? - खरं तर नाही म्हणजे प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ 'घटना' याच्यापुरता मर्यादित नसावा. मग आपण झगडत का नाही उत्तर शोधायला? कदाचित आधीच्या बर्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली तर पुढे पड़णार्या प्रश्नांची संख्या कमी होऊ शकेल का? आणि आपल्या विकासासाठी प्रश्नांची उत्तरं मिळणं किंवा शोधून काढणं आवश्यक नाही का?

प्रश्न सोडवायचा म्हटला की चर्चा आली, वाद आले, मतभिन्नता आली कदाचित भांड़णं मग भांड़णंही विकोपाला जाणं. सगळं नीट सान्धता आलं तर ठीक पण नाही जमलं तर ताटातूट, तणाव, मनस्ताप असं काही बाही. खरं तर या फार टोकाच्या गोष्टी झाल्या पण मुळात किती व्यक्ती प्रश्न सोड़वण्यासाठी चर्चा करायला तयार असतात? त्यातून उद्भवलेच वाद किंवा अगदी भांड़णं सुद्धा तरी त्यालाही तयार असतात? वादविवाद, भांड़णं नकोत म्हणून एकाचं कुणाचंतरी ऐकण्याकडे किती कल असतो आपला? आणि मग त्या एकाचं ऐकता ऐकता तोच नियम बनतो. रीत, रुढी अशाच बनतात का? आणि मग असे काही प्रश्न पडले एखाद्याला- चकोरीला सोडून असलेले तर मग त्या प्रश्नांचं काय? त्या प्रश्नांना देतात का कुणी महत्त्वं? ते प्रश्नं सोडवण्याचा करतं का प्रयत्नं? त्या चाकोरीबाहेरचे प्रश्न पड़णार्या माणसाचं काय होतं आणि? त्याला चकोरीतलीच, चकोरीला धरून असलेली उत्तरं मिळाली आणि त्याने ती स्वीकारली तर विशेष काही फरक पडत नसेल बहुदा पण चकोरीला सोडून असलेलं उत्तर निवड़लं तर काय होतं? कुणाची सोबत राहाते का शिल्लक त्याला? किमान समाधान तरी असतं का त्याला- आपल्याला उत्तर मिळालं त्याचं की हळहळ असते मनात- चाकोरीबाहेरचं उत्तर स्वीकारण्याची मोठी किंमत द्यावी लागली त्याबद्दलची?

ज्यांना प्रश्नांची उत्तरं मिळवणं खूप महत्त्वाचं वाटतं, चाकोरीला सोडून असेल तरीही उत्तर मिळवण्याकडे ज्यांचा कल असतो त्यांना या उत्तरांची बरीच किंमत द्यावी लागत असेल का आयुष्यात? मग त्यांनी उत्तर मिळवण्याकडे कल ठेवायचा की बाकीच्या गोष्टी साम्भाळायच्या?, किंमत कमी द्यायला लागेल असं बघायचं?

एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कसं ठरवणार हे योग्य उत्तर आहे ते? योग्य उत्तराचे निकष कोणते? हे निकष फारच व्यक्तीसापेक्ष असणं शक्य आहे. जेव्हा स्वतःपुरते प्रश्न सोडवायचे असतील तेव्हा हे निकष वापरणं शक्य आहे पण जेव्हा स्वतःखेरीज अन्य कोणी त्याच्याशी सम्बंधित असतील तेव्हा कोणते निकष वापरायचे? आपण जे निकष वापरतोय त्यामुळे सम्बंधित कुणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करतो का आपण?

किती प्रश्न आहेत मला... कधी शोधणार मी त्याची उत्तरं? बघू निदान शक्य तितके प्रयत्न करून उत्तरं शोधायला हवीत हा विचार तरी मनात आला... हेही नसे थोडके.

Friday, April 10, 2009

बाईंचं घर

मी पहिली- दुसरीत असेन. काका म्हणाले, "तुझ्या बाईंच्या घरी यायचय का?'' बाईंचा मुलगा काकांचा मित्र आहे ते माहिती होतं पण कधी त्यांच्या घरी वगैरे जाणं होईल अस मनातही नव्हत आल. मी अर्थातच 'हो' म्हणाले.

असलेल्या फ्रॉक मधला सर्वांत चांगला फ्रॉक घालून काकांसोबत बाईंच्या घरी जायला निघाले. नुसत्या शाळेतल्या बाई नाही, वर्गशिक्षिका नाही चक्क मुख्याध्यापिका बाईंच्या घरी जाणं म्हणजे ग्रेटच गोष्टं होती- निदान ९०-९१ सालात, मराठी शाळेत पहिलीत शिकाणार्या मुलीसाठी तर नक्कीच होती.

आम्ही गिरगावातून चालत निघालो. काका नेत होते तो रस्ता चौपाटीला जाणारा होता.- ' म्हणजे बाई चौपाटीच्या जवळ रहातात? किती मज्जा येत असेल त्यांना रोज समुद्र बघताना? ' असे काय काय विचार मनात चालू असतानाच आम्ही एका बिल्डिंगमध्ये शिरलो. खूप उंच बिल्डिंग होती. आमच्या दोन मजली चाळीपेक्षा तर खूपच उंच. आम्ही लिफ्टपाशी गेलो. बाईंच्या बिल्डिंगमधली लिफ्ट खूपच भारी होती. आवाज न करता आपोआप सरकणारे स्टीलचे दरवाजे असणारी. आणि आपण सांगू त्या मजल्यावर न्यायला आत एक दादा पण होता. माझ्या ओळखीत फक्तं बापू आजोबांच्या बिल्डिंगमध्येच लिफ्ट होती- ती पण आवाज करणारे लोखंडी दरवाजे असणारी . त्याच्यापेक्षा ही लिफ्ट खूपच छान होती. काकांनी 'सिक्स्थ फ्लोअर' अस त्या दादाला सांगितलं आणि लिफ्ट सुरु झाली हे कळायच्या आतच आम्ही सहाव्या मजल्यावर जाऊन पोहोचलो.

व्हरान्डयातून उजवीकडे वळल्यावर बाईंचं घर होतं. दरवाज्याच्या पाटीवर दोन नावं होती पण ती इंग्रजीतून असल्यामुळे नक्की कुणाची होती ते कळलं नाही. बाईंच्या घराला दोन दारं होती. काकांनी बेल वाजवली. बाईंनीच दार उघडलं आणि खूप छान हसून 'या आत' म्हणाल्या. दाराजवळच्या कोपरय़ात आम्ही चपला काढल्या. बाई, 'बसा हा, मी आले' असं म्हणून आत गेल्या. बाईंच्या घराचा हॉल खूपच मोठा होता आणि खाली पायांना मस्त मऊ मऊ लागणारा गालिचा होता-आई हळकुंकवाच्या वेळी खूप बायका यायच्या तेव्हा घालायची त्याच्या पेक्षा हा गालिचा खूपच मऊ होता. सोफा पण बसल्यावर एकदम आत जाणारा होता. मी एकदम शहाण्या मुलीसारखी शांत बसले होते. तेवढ्यात बाई पाणी घेउन बाहेर आल्या. एक छान ट्रे मधून दोन काचेच्या ग्लासातून पाणी आणलं होत. मला म्हणाल्या- 'हळू पी हां'. फ्रिज मधलं थंडगार पाणी होतं . फ्रिज मधलं पाणी प्यायलं तर आई ओरडेल हा विचार मी झटकून टाकला आणि काकांचं बघून अर्धाच ग्लास पाणी पिऊन ग्लास नीट आवाज न करता समोरच्या काचेच्या टी-पॉय वर ठेवला. मग बाई आणि काका मला न कळणार्या अवघड विषयांवर गप्पा मारायला लागले-कसल्यातरी बैँक, राजकारण वगैरे विषयांवर. मला बरंच झालं- शांतपणे बाईंचं घर बघून घेता आलं. बाईंच्या घरी मोठ्ठा टिव्ही होता आणि त्याच्या शेजारी रिमोट पण ठेवला होता. ज्या छोट्या काचेच्या कपाटात टिव्ही ठेवला होता त्याच्यातच एक टेप रेकॉर्डर होता- त्याला सीडी प्लेअर म्हणतात असं मला खूप उशिरा कळलं. खूप कमी आवाजात काहीतरी इंग्रजी गाणी लागली होती. शब्द तर कळतच नव्हते पण आईबाबा मला छायागीत पण बघू देत नाहीत तर बाईंकडे इंग्रजी गाणी कशी काय चालतात? हा प्रश्नं काही सुटेना पण बाई ऐकतायत म्हणजे ते नक्कीच वाईट नसणार असं मात्र वाटलं.

बाईंच्या घराचा रंग पण वेगळाच होता. खूप प्रसन्न असा. छताला दोन झुम्बरं पण होती. भिंतीवर कसली कसली चित्र होती- वेडयावाकड्या आकारांची- अर्थ न कळणारी पण दिसायला छान दिसणारी. कोपर्यातल्या एका कोरलेल्या स्टुलावर फुलांचा गुच्छ ठेवलेला पारदर्शी ग्लास होता. टीपॉयच्या खालच्या कप्प्यात बाबा फक्त रविवारी आणायचे तसला इंग्रजी पेपर आणि कुठलीतरी इंग्रजी मासिकं होती. भिंतीवरच्या कपाटात वेगवेगळी पुस्तकं होती. माझं कधीपसूनचं स्वप्नं होतं- घरातसुद्धा मावणार नाहीत एवढी पुस्तकं विकत घेण्याचं. बाईंकडे निदान एक कपाट भरेल इतकी तरी पुस्तकं आहेत- मला त्यतलं एखादं सोपं पुस्तक देऊन- 'वाचून परत आणून दे ' म्हणतील का? अशा विचारात मी असतानाच बाईंचं आणि काकांचं बोलणं संपलं, काकांनी एक फाइल बाईंकड़े दिली आणि त्यांच्या मुलाला द्यायला सांगितली आणि आम्ही जायला निघालो. बाई हसून 'ये हा उद्या शाळेत' म्हणाल्या. आम्ही घरी आलो. पुढचे कितीतरी दिवस 'बाईंचं घर' हा विषय आम्हाला मधल्या सुटीत डबा खाताना पुरला.

.......


परवा माझे पाच-सहा विद्यार्थी घरी आले होते- 'ताई तुझं घर बघयचय' म्हणत. सगळी कॉलेजच्या पहिल्या-दुसर्या वर्षात शिकणारी मुलं. घरी आल्यापासून 'तू दारावरची पाटी मुद्दामहून मराठीत ठेवलीयेस का? ही चिनीमातीची विंड बेल कुणी दिली? हा फोटो कुणी काढला? तुझा भाऊ एवढे छान फोटो काढतो? ए, हा पेन स्टैंड तू बनवलायस? तुझं DVD's collection किती छान आहे..! तू इराणी वगैरे सिनेमे पण बघतेस?' हे आणि असे कितीतरी प्रश्नं विचारून त्यांनी मला भंडावून सोडलं. या प्रश्नान्मधून डोकावणारी त्यांची 'ताईचं घर' बघण्याची उत्सुकता, कुतूहल, नविन गोष्टिन्चं अप्रूप, आपल्यात आणि ताईच्यात कही साधर्म्य आहे का ते शोधण्याची धडपड आणि वेगळेपण असेल तर ते काय आणि ते कमीतकमी असावं अशी त्यांची इच्छा वगैरे जाणवली आणि मी पाहिलेलं 'बाईंचं घर' इतक्या वर्षानंतरही लख्खपणे समोर आलं. तेव्हा मी खूपच बुजरी होते. या मुलांइतकी धीट नव्हते. ही सगळी माझ्यापेक्षा खूपच धीटपणे आणि मोकळेपणाने वावरतायत. तेव्हाच्या माझ्यातला आणि आजच्या यांच्यातला एवढा फरक सोडला तर त्यांची उत्सुकता तर तीच आहे... मला आश्चर्य वाटलं आणि समाधानही.. काळ बदलला तरी कही गोष्टी बदलत नाहीत हेच खरं....

Friday, April 3, 2009

प्रिय डायरी

अगं,आज गुरुपौर्णिमा आहे. आमच्या होस्टेल मधे पण गुरुपौणिँमेचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. चारच दिवसांपूर्वी एक कल्पना पुढे आली होती की गुरुपौणिँमेच्या दिवशी केवळ 'गुरूजी, बाई' या अर्थी नाही तर 'एकूणच आयुष्यात ज्या ज्या कशापासून आपण शिकतो' आशा विस्तृत अर्थानं 'गुरु' या संकल्पनेबद्दल बोलायचं. मला 'नाती- आपले गुरु' हा विषय छान वाटला बोलायला. नंतर विचार करताना लक्षात आलंकी आजूबाजूची माणसं, त्यांच्याशी असलेलं आपलं नातं, सम्बंधित अनुभव विश्व यातून आपण शिकत असतो, घडत असतो, समृद्ध होत असतो तरीही आपण नाती/ नातेसंबंध याबाबत फरसा विचार नाही केलेला.

' नातं' म्हणजे नक्की काय? केवळ सम्बन्ध- परंपरेने येणारे/ रक्ताचे? म्हणजे आई-वडीलांचे भाऊ-बहिणी, काका, मामा, आत्या, स्वतःची भावंडे असे? पण अशी अगदी रक्ताची नाती पाण्याहूनही पातळ झालेली आपण पहातोच की.
अशी नाती तुटतात आणि पुन्हा जुळतच नाहीत. म्हणजे मग रक्ताच्या नात्यांना काही अर्थ उरतो का? मग एखाद्याच्या भावनेची जाण/ समज म्हणजे नातं का? - एकमेकांना समजुन घेउन त्या त्या व्यक्तिसन्दर्भात त्याच्या कलानुसार वागणं, वगावसं वाटणं म्हणजे नातं निर्माण होणं का? की फक्त 'ओळख' हेही एक नातं असतं आणि पुढे ते समृद्ध होत जातं? छोट्या ओळखीतून हळूहळू त्या माणसाचीच एकूण ओळख पटत जाते, ती आपल्याला हवीहवीशी वाटते आणि आपण नातं जोडायचा प्रयत्न करतो. अर्थात एकतर्फी पटलेली ओळख हे नातं असतं का? हा प्रश्नच आहे.

आपण तरी किती नात्यांमधे गुरफटलेले असतो ना? औपचारिक स्वरुपाची तर काही अनौपचारिक, काही आनंद देणारी, काही दुःखदायक, रागालोभाची, प्रेमाची, काही समजून घेणारी, काही समजून घ्यायला लावणारी अशी कितीतरी. काही नकोशी वाटणारी पण काही तर अशीही की जी आपल्या आयुष्यातनं कमी केली तर बाकी फारशी उरत नहीं. विश्वास, मोकळेपणा, सामंजस्य, मैत्रीभाव, आपलेपणा, प्रेम यावर आधारलेली किंवा यामुळे निर्माण झालेली नाती टिकतात, हवीहवीशी वाटतात, आवश्यकच असतात आणि आपल्याला खूप काही शिकवतात अर्थात गैरसमज, संकुचितपणा- वागण्यातला, विचारांचा; राग, द्वेष, मत्सर अशा अनेक कारणाने तुटलेली किंवा मुळातच जुळू न शकलेली नाती सुद्धा बरीच शिकवण देतात हेही खरंच.

कोणत्याही आदर्श नात्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतील, वाद होत असतील पण भांडणं होत नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मोकळेपणाने सांगता येतं आणि दूसरा त्याचा राग मानत नाही, खोटेपणा तर मुळीच नसतो. समोरच्या व्यक्तीचा धाक वाटत असेल कदाचित पण भीती नसते. काटेकोर व्यवहार असू शकतो पण प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा हे सगळं असतच.समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांचं ओझं वाटत नाही उलट त्याला अपेक्षपूर्तीचं समाधान देताना आनंद वाटतो. आणि कधी या अपेक्षा पूर्ण करता न येणार्या, त्रासदायक वाटल्याच तर तसं स्पष्टपणे सांगण्याचं आणि ऐकून घेण्याचं धैर्य दोघांमधेही असतं. परस्पर सामंजस्य असतं, एकमेकांबांबत empathy असते, दुसर्याचे आनंदाचे, दुःखाचे, संतापाचे, उत्कटतेचे क्षण आपणही तितक्याच समरसतेने अनुभवू शकतो, त्याच्या प्रत्येक 'मूड' मध्ये सहभागी होवू शकतो. चूका करत असेल तर समजावू शकतो पण चूका करण्याची, त्यातून स्वतः , शिकण्याची, सुधारण्याची, अधिक चांगलं काम करण्याची मुभाही देऊ शकतो. चांगल्या नात्यामध्ये दोघंही एकमेकांचा, एकमेकांच्या आवड़ीनिवडींचा, तत्त्वांचा, विचारांचा, आदर्शांचा मान ठेवतात, दुसर्या व्यक्तीला ती जशी आहे तसं स्वीकारतात. एकमेकाना साम्भाळूनघेतात. एकमेकाना समजुन घ्यायला, संवाद साधायला शब्दांची भलीमोठी जाळी विणावी लागत नाहीत. केवल शान्तपणा, मूक सम्भाषणही पुरेसं होतं.

आपल्याला समृद्ध, प्रगल्भ करण्यात ही सगळी नाती खूप महत्त्वाची भूमिका वठवतात. नाती आपल्याला शिकवतातच की, कसं वागावं आणि कसं वागू नये ते. अर्थात प्रत्येक जुळलेल्या वा तुटलेल्या किंवा जुळण्याच्या प्रक्रियेत असणार्या नात्यामधून काही न काही शिकून ते पुढच्या आयुष्यात वापरण्याचा काम तर आपणच करायला हवं. अजाणतेपणी तर ते होत असतच पण जणीवपूर्वकही करायला हवं. आणि माझ्या बाबतीत, खरं तर होस्टेल मधल्या कुठल्याही मुलीच्या बाबतीत हे खरं आहे की आपल्या घरापासून, आपल्या माणसांपासून दूर राहाण्याची किम्मत द्यावी लागली तरीही आतल्या, घट्ट नात्यांचा शोध घेणं किती सोपं होतं ग. तुझं- माझं तरी कसं नातं की तुझा माझ्या खासगी आयुष्यात पण मुक्त संचार. आपलं हे गोड नातं असंच टिकवून ठेवू, अर्थातच माझ्या....

Thursday, April 2, 2009

सुरुवात

अवधूत म्हणाला तुला जे लिहवस वाटत त्यासाठी ब्लॉग हा चांगला पर्याय आहे. मी technophobic आहे पण तरीही ब्लॉग हा जरा सोपा पर्याय आहे अस मलाही वाटतय आता. प्रश्न फक्त मराठी फॉण्टचा आहे पण तो लवकरच सोडवेन मी.