Friday, November 26, 2010

बिफोर सनराईज आणि बिफोर सनसेट

. . .बिफोर सनराईज . . .
. . .बिफोर सनसेट

मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा ज्या इंग्रजी सिनेमांवरून घेतलाय (?, चोरलाय) ते हे दोन सिनेमे. एक मुलगा आणि एक मुलगी एका ट्रेनच्या प्रवासात भेटतात. एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. ब-याच गप्पा वेगवेगळ्या विषयांवर मारतात. सुरुवातीला साध्यासुध्या विषयांवर असलेल्या गप्पा नंतर थोड्या अडनिड्या, अवघड विषयांवर पण होतात. एक सबंध संध्याकाळ, रात्र ते एकमेकांसोबत असतात. वेगवेगळे अनुभव घेतात. मजा करतात. एका प्रवासात भेटलेल्या दोन माणसांची साधी गोष्ट आहे खरं तर. पण उगीचच वाढीव भावूकता, नाट्यमयता न आणता सुंदर मांडलीये.

बिफोर सनसेटमध्ये नऊ वर्षांनी तेच दोघं जण परत भेटतात. तोपर्यंत त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला लहान मुलगा असतो आणि ते दोघं भेटलेल्या संध्याकाळ-रात्रीवर आधारित एक पुस्तक लिहून तो लेखक झालेला असतो. या मधल्या वर्षांमध्ये त्यांचा एकमेकांशी कोणत्याच मार्गांनी काहीच संपर्क नसतो. इतक्या वर्षांनी भेटल्यावर मधल्या काळातल्या घडामोडी, अनेक नातेसंबंध, कुटुंब वगैरे ब-याच विषयांवर त्यांच्या गप्पा होतात. आधीच्या भेटी इतक्याच इंटेन्सिटीने ते एकमेकांशी बोलू शकतात.

या सिनेमाचे संवाद लिहिताना सिनेमातल्याच नट आणि नटीची मदत घेतलेली आहे, त्यामुळे खूपच नैसर्गिक, स्वाभाविक संवाद आहेत. रोमान्सची भडक कल्पनाच भारतीय सिनेमांमध्ये अनेकदा दिसते त्याच्या अगदी विरुद्ध असा खूप मस्त सिनेमा आहे हा.

आकर्षण, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, जवळीक, नातेसंबंध यांच्यावर वाचायला, लिहायला, पाहायला ज्यांना आवडतं त्यांनी हे दोन्ही सिनेमे जरूर पाहावेत असं वाटतं.

Thursday, April 1, 2010

ब्लॉगचा पहिला वाढदिवस.

आज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. अवधूतने आग्रह केला आणि मदतही केली म्हणून ब्लॉग उघडू शकले. वर्षभरात नियमीतपणे नाही तरी अधूनमधून काही लिहू शकले. मला हे लिहिताना मजा आली. आपण काहितरी लिहीलंय आणि कुणीतरी ते वाचतंय, त्याच्यावर वाटलं तर काही प्रतिक्रिया देतंय ही भावनाच सुखावह आहे. प्रतिक्रिया नाही मिळाली तरीही अनुभवलेलं काहीही, केव्हाही, कसलंही बंधन न बाळगता लिहिता येण्याचं स्वातंत्र्य मला आवडलं.
एका वर्षात बरेच वेगवेगळे अनुभव आले किंवा घेता आले. त्यातल्याच काही अनुभवांबद्दल लिहिलं. आणि आयुष्याच्या या वळणावर एकूणच आनंद, मजा, सुख या सगळ्याची कमतरता भासत असताना ब्लॉग वर काही लिहिण्याचा अनुभव आनंददायक वाटला.

आता या ब्लॉगच्या ‘पहिल्या’ वाढदिवसाबद्दल लिहितेय तर अनेक पहिल्या गोष्टी आठवतायत आयुष्यातल्या. कदाचित पुढची पोस्ट त्याबद्दल लिहेन.

Tuesday, March 30, 2010

"आपण आपलं आपलं जाऊ.."

सहज म्हणून एकदा एका चांगल्याशा हॉटेल मध्ये गेलो होतो. जेवण झाल्यावर लिफ़्टपाशी आलो तर एक लहान मुलगा तिथे रेंगाळला होता. एकदम निवांतपणे, आजूबाजूला काय चाललंय याचा अजिबात विचार न करता त्याचं स्वतःशी काहीतरी गुणगुणत खेळणं सुरू होतं. आम्ही त्याला मध्येच खेळात disturb न करता त्याचे आईबाबा कुठे दिसतायत का ते पाहीलं पण ते लगेच काही दिसले नाहीत. मग आमची लिफ़्ट्मध्ये आत जाण्याची वेळ आली तेव्हा तोही आमच्या बरोबर आत यायला लागला तर त्याची आई कुठूनशी आली आणि त्याला म्हणाली, " चल बेटा, त्यांच्यात नको जाऊ. आपण नंतर आपलं आपलं जाऊ, ये इकडे." तो त्याच्या आईचा हात धरुन मागे झाला.

लहान मुलं त्यांच्या आई-वडीलांकडे बघून, त्यांचं अनुकरण करत करत शिकतात म्हणे. तो मुलगा काय शिकला असेल त्याच्या आईच्या या बोलण्यातून?- हे ‘आपलं आपलं’ नावाची काहीतरी भानगड असते हे की घरातल्या माणसांखेरीज अन्य माणसांशी शक्यतो जवळीक करायची नसते हे की संशय, संकुचितपणा की आणखी काही?
कुणास ठाऊक काय शिकला? आपल्याला काय करायचंय? ते त्यांचं त्यांचं पाहूदेत, आपण आपलं आपलं पाहू..
(माझ्यात ही ‘आपलं आपलं’ म्हणजे काहीतरी वेगळं असण्याची भावना कितपत आहे?- तीव्र, मध्यम की कमी? शोधायला हवं.)

Wednesday, March 17, 2010

आवाज..

रात्रीची बारा- साडेबारा किंवा त्याच्यापुढची कुठलीही वेळ.. आठवड्यातला कोणताही दिवस.. तुम्ही दिवसभराच्या प्रचंड कामाने दमलेले.. तुमच्या घराला खरं तर खोलीला latch ची सोय नाही.. तुमच्या दोन रूम पार्टनर आहेत.. त्या रोज असंच सहज म्हणून कुठेतरी गेलेल्या असतात.. तुम्ही बराच वेळ त्या येण्याची वाट बघून झोपायचा विचार करता.. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही रात्री अपरात्री कितीही वाजता उठून त्यांच्यासाठी दार उघडलेलं असतं.. पण हे रोजचं झाल्यावर तुम्ही कंटाळता.. मग बराच विचार, धीर वगैरे करून तुम्ही दार नुसतं लोटून घेऊन झोपायला लागता.. (आणि संदीप खरेच्या कवितांनी बाकी काही नाही तरी 'पायी रुतल्या काचांचा त्रास करून न घेता त्याची नक्षी मांडायला शिकवलेलं असतंच..) तुम्हाला अर्थातच स्वस्थ झोप लागत नाहीच कारण तुमचं 'दिल' ' all izz welll ' असं सांगून ऐकणार्यातलं नसतं.. हळूहळू तुमची प्रगती होत होत तुम्हाला याही परिस्थितीत झोप नाही तर निदान गुंगी तरी यायला लागते..
आणि मग....
तुमच्या रूम पार्टनर रूमवर येतात.. लोटून घेतलेलं गंजकं लोखंडी दार पहिला आवाज करतं.. तिथून पुढे आवाजांची मालिका सुरु होते.. संडल्सचे वेल्क्रो काढल्याचे आवाज.. हातातल्या प्लास्टिक पिशवीच्या चुरगाळल्याचा आवाज.. ती कुठंतरी खाली ठेवल्याचा आवाज.. बाथरूमचा दिवा लावतानाचा बटणाचा आवाज.. बाथरूमचं दार उघडल्याचा, पाण्याचा नळ सोडल्याचा, पाय एकमेकांवर घासल्याचा, साबणाची डबी उघडल्याचा, कधी कधी ती पडल्याचा आवाज.. पाय घासत चालल्यामुळे होणारा आवाज (आपले पाय साधं चालताना पण किती आवाज करतात यांसारख्या क्षुद्र विषयांवर विचार करायला तुमच्या रूम पार्टनर्सना वेळ नसतो).. sack मधून वस्तू काढल्याचा आवाज, त्यावेळी sack च्या पहिल्या छोट्या कप्प्यात असलेल्या अनेक पेनं- पेन्सिलींचे आतल्या आत होणारे आवाज.. दाट केस खसाखसा विन्चराल्याचा आवाज.. पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडल्याचा, त्यातून गटागट पाणी प्यायल्याचा आवाज.. मग चादर झटकल्याचा, उशी नीटनेटकी केल्याचा आणि सरतेशेवटी त्यांना गरजेचा असतो म्हणून मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी इयर फोन च्या वायारींचा गुंता सोडवण्याचा आवाज.. मग गाढ झोपेमध्ये घोराल्याचा आवाज.. हा कदाचित त्यांच्याकडून होणारा किंवा होत राहणारा शेवटचा आवाज..

ह्या सगळ्या आवाजांमध्ये तुम्ही काय करता?? - निश्चयपूर्वक शांत झोपण्याचा प्रयत्न.. श्वासावर नियंत्रण.. आपल्याला अजिबात त्रास होत नाहीये, अजिबात राग आलेला नाहीये असं स्वतःच्या मनाला पटवण्याची धडपड.. आणि गेला बाजार अशी काहीतरी पोस्ट लिहिण्याचा विचार..

Sunday, March 14, 2010

संकल्पाचं बळ.

मध्यंतरी एकदा मला अचानक 'संकल्पाचं बळ' या विषयावर बोलावं लागलं. 'बोलावं लागलं' म्हणजे मला इच्छा नव्हती बोलायची पण 'पार्ट ऑफ माय ड्युटी' म्हणून करावं लागणार होतं. एकतर मला अशा अवघड नावं असलेल्या विषयांवर, औपचारिक असं फारसं बोलता येत नाही. समोर बरीच माणसं काहीतरी चांगलं, महत्वाचं ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनी बसलेली असताना आपण मात्र जाऊन आपल्या थोटक्या अनुभवानिशी, फारसा आवाका नसलेलं काहीतरी बोलून यायचं हे मला अन्यायकारकच वाटतं. पण बोलायलाच लागणार म्हटल्यावर ठरवलं की 'आपण काही संकल्प केले असतील आयुष्यात त्याबद्दलच बोलावं'.

मला वाटतं- 'संकल्प म्हणजे, आपण जे काही ठरवतो आयुष्यात- कोणत्याही परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं, कसं करायचं ते असावं'. बरेचदा आपण आपले संकल्प शब्दांत मांडत नाही. अनेकदा तशी गरजच पडलेली नसते किंवा त्याबद्दल विचार केलेला नसतो किंवा असे काही संकल्प वगैरे असतात असं मुळात अनेकांना वाटतंच नाही (आणि बरेचदा दुसर्याचे संकल्प ही खिल्ली उडवण्याची गोष्ट असते.)
तर मी विचार करत होते कि माझे काय संकल्प होते किंवा आहेत आयुष्यात? मी केव्हा शब्दांत मांडले माझे संकल्प? नीटसं
आठवत नाही पण आई-बाबा, शाळेतले शिक्षक यांनी जे सांगितलं, शिकवलं ते सतत घोकून, तसंच वागायचा प्रयत्न करताना असेल किंवा थोडेथोडे स्वतःचे विचार करायला जमायला लागलं- कुठलीही गोष्टं स्वतःच्या निकषांवर पडताळून पाहायला हवी असं वाटायला लागलं तेव्हापासून असेल, नक्की कधी ते आठवत नाही.

नेहमीचं शांत, निवांत आयुष्य सुरु असताना संकल्पाचं, ते शब्दांत मांडण्याचं, त्याबद्दल विचार करण्याचं महत्त्वं बहुदा वाटत नाही पण जेव्हा कठीण, अनपेक्षित परिस्थितीला किंवा संकटाला तोंड द्यावं लागतं तेव्हा हे महत्त्वं पटतं.
मला आनंदात, उत्साहात, मुक्तपणे राहायला आवडतं. अंगावर घेतलेलं काम नेटानी पूर्ण करायला आवडतं. प्रामाणिक असायला आवडतं आणि असंच काहीबाही.. तर असं सगळं- शहाण्यासारखं सुरळीत आयुष्य सुरु असताना खूप सोपं होतं पण आता जरा वेगळ्या वळणांनी चाललंय आयुष्य तर ह्या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी पाळणं कष्टाचं वाटतंय. तरीही शब्दांत नीट मांडलेले संकल्प मदतीला येतात असंही जाणवतंय.

हे सगळं का लिहीलं मी आत्ता तर- अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पाहतेय सध्या स्वतःबद्दल त्यात हेही तपासू म्हटलं आणि तपासताना लिहावंसं वाटलं इतकंच.

Friday, February 19, 2010

Battle to save the Tiger च्या निमित्ताने...

ताडोबात जाऊन आल्यापासून व्याघ्रदार्शनाच्या अनुभवाबद्दल लिहायचं होतं पण राहून गेलं. आता वसुंधरा फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा जाग्या होताहेत तर लिहायचं ठरवलं. 'Battle to save the Tiger' नावाची एक मस्त फिल्म परवाच पाहिली त्यात वाघांच धोक्यात आलेलं अस्तित्व आणि त्या अनुषंगाने काही विषय मांडलेत.

तर ताडोबातल्या सुरुवातीच्या तीन दिवसात बरेच प्राणी आणि पक्षी दिसले. चितळ,गवा,ससे, मुंगुस, शेकरू, माकड, वानर, चौशिंगा, रानडुक्कर असे प्राणी आणि खंड्या, बगळे, सातभाई, पाणकोंबडी, मोर, लांडोर, पोपट, घुबड यांच्यासारखे पक्षी आणि असेही काही ज्यांची नावं नीटशी माहित नाहीत. एक दिवस हत्तीवरून सगळं जंगल फिरून आलो तरी वाघ दिसला नव्हता. पण तरीही प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या ठिकाणी पाहताना खूप मजा येत होती. वाघ बघण्यासाठी खूप विशेष प्रयत्न करायचे नाहीत असं आधीच ठरवलं होतं कारण वाघ बघण्याच्या नादात बाकी काहीच पाहिलं नाही किंवा ते पाहण्यातली मजा घालवली असं करायचं नव्हतं.

एक दिवस 'मचाणावर बसण्याचा' अनुभव घ्यायला म्हणून बाहेर पडलो आणि एका मचाणावर जाऊन बसलो. तिथे खूपच डास चावत होते. मचाणापासून जवळच एक तळ होतं. तिथे एक हरीणांचा कळप निवांत फिरत होता, बरीच माकड झाडांवरनं मस्ती करत होती. एक घुबड खूप वेळ ध्यान करत असल्यासारखं एका फांदीवर बसलं होतं. बराच वेळ नुसत्या डोळ्यांना दिसेल ते आणि अधूनमधून दुर्बिणीतून जे दिसत होतं ते बघण्यात गेला आणि असंच इकडेतिकडे बघत असताना एक चट्टेपट्टे असलेला चेहेरा आपल्या मचाणाकडे बघतोय असं जाणवलं. नीट बघितल्यावर लक्षात आलं कि तो वाघ आहे. तो नक्की वाघच आहे हे कळल्यावर जे जाणवलं ते शब्दात नेमकं मांडता येणार नाही. पण कानात प्राण आणून ऐकणे आणि डोळ्यात प्राण आणून बघणे म्हणजे काय ते मला त्या दिवशी ताडोबात जाणवलं. वाघ दिसल्यापासूनचा प्रत्येक क्षण फक्त त्याच्या हालचाली बघण्यात आणि शक्य तितके त्याचे आवाज ऐकण्यात गेला. एरवी जवळपास वाघ असेल तर इतर प्राणी कॉल देऊन एकमेकांना सावध करतात पण त्याच्या हालचाली जाणवेपर्यंत इतर प्राण्यांना बराच वेळ लागला. मात्र एकदा वाघ आहे म्हटल्यावर बाकी सगळे प्राणी लांबवर पळून गेले.
आम्ही एकटकपणे त्याच्याकडे बघत होतो. तो ऐटीत चालत चालत एका झाडापाशी पोहोचला. मध्येच तो गुरकावल्यासारखे आवाज करत होता. झाडाच्या सावलीत बसल्यावर त्याने पुढचे पाय थोडे ताणून आळोखे पिळोखे दिले. आपल्या जबड्यावरून त्याने जीभ फिरवली, तोंडावर येणाऱ्या माश्या, चिलट पंजांनी झटकली आणि तो पुन्हा मचाणाकडे बघायला लागला. त्याचं चालण, गुरकावण, आजूबाजूच्या परिसरावर नजर फिरवण हे सगळ इतकं ग्रेसफुल होतं कि या प्राण्याने असं आपल्या समोर वावरत रहावं आणि आपण नुस्त त्याच्याकडे बघत रहावं असं वाटत होतं. मधल्या काळात जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचं शूटिंग केलं, शक्य तितके फोटो काढले आणि नुस्त त्याच्याकडे पाहत थांबलो. कदाचित कुणीतरी आजूबाजूला आहे हे लक्षात आल्यामुळे असेल पण तो निघण्यासाठी उठला आणि आला तसा आपल्या तोर्यात निघून गेला.

वाघ हे अत्यंत उमदं जनावर मी जे त्या दिवशी ताडोबात पाहिलं तो माझ्यासाठी एक अत्यंत आनंददायक आणि अविस्मरणीय अनुभव ठरलाय. आज हे लिहिताना सुद्धा मला तो क्षण जगतेय असं वाटतंय. सर्वांनाच एकदातरी असा अनुभव घ्यायला मिळावा असं वाटतं.

Tuesday, February 16, 2010

'ग्राफिटी वॉल'

कविता महाजन यांचं 'ग्राफिटी वॉल' नुकतंच वाचलं. केवळ एक व्यक्ती म्हणून (स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही) लिहिणाऱ्या कमी माणसांमधल्या त्या वाटतात. 'ब्र', 'भिन्न' किंवा क्वचिद कुठेतरी वाचलेल्या कविता यातून त्यांच्या लिखाणाविषयी काही मतं तयार झाली आहेत.

आजकाल एकूणच स्वतःला जे वाटतं ते बोलणं, लिहिणं करणं याकडे लोकांचा फारसा कल नसताना आणि केवळ इतरांना काय आवडेल, रुचेल, पटेल ते आणि तसंच बोलणारी, वागणारी माणसं आजूबाजूला वावरत असताना मनात येणारं बरचसं लिहू शकणाऱ्या लेखक, लेखिकांच लिखाण वाचायला मिळालं की बरं वाटतं.

एक विशिष्ट विषय, शब्दमर्यादा असं न ठेवता ब्लॉग वर जसं, जेव्हा जे जसं वाटतं तसं लिहिलं जातं तशा प्रकारचं हे लिखाण आहे. बरेच वेगवेगळे ऑफ बिट विषय यात मांडलेत. मला वाचायला आवडलं. शक्य असेल तर मिळवून सगळ्यांनीच वाचावं असं वाटतं.

Wednesday, February 10, 2010

....बरंच लिहिण्यासारखं असूनही खूप दिवसात काहीच लिहिलं नाही. 'नटरंग' आणि 'हरीश्चन्द्राची Factory' हे दोन मस्त मराठी सिनेमे पाहिले. 'ईश्कीया' पण पहिला विशाल भारद्वाजचा. चांगला वाटला.

'अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी' आणि 'रसीदी टिकट' अशी अमृता प्रीतम यांची किंवा यांच्यावरची पुस्तक वाचली. या बाई ग्रेटच होत्या असणार.
या सगळ्याबद्दल लिहायचंय पण कधी जमेल त्याचा अंदाज नाही. लवकरच काही लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.

Monday, January 4, 2010

नातं हॉस्टेलशी..

(पुढे चालू..)

हॉस्टेलमधली आपली सर्वात आवडती जागा म्हणजे आपला टि.व्ही. हॉल. रविवारी सकाळी 'रंगोली' पाहण्यासाठी मुद्दामहून लावलेला गजर, न चुकता बघितलेलं रविवार दुपारचं 'छायागीत' आणि खूप झोप आली तरीही मन लावून बघितलेले शुक्रवार-शनिवारचे रात्रीचे सिनेमे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटच्या matches बघताना केकेली धमाल. एकेका रनसाठी सुद्धा दिलेले 'थ्री चीअर्स', आपला आवडता खेळाडू खेळायला आला कि 'तो आज नक्की शंभर रन्स करणार' अशी अनेक जणींनी वर्तवलेली भविष्य. एखादी मैत्रीण 'बाहेरून टि. व्ही. हॉल मध्ये येणं' हे विशिष्ट खेळाडूसाठी 'लकी' आहे असं आपणहूनच ठरवून तिला अनेकदा दारातून आत- बाहेर करायला लावण्याचा वेडेपणा, match संपल्यानंतर केलेला दंगमागे बसलेल्या मुलींना टि. व्ही. व्यवस्थित दिसत नाही म्हणून पुढच्या मुलींनी अवघडून वाकून बसणं किंवा एकमेकींच्या मांडीवर एक आड एक झोपून कार्यक्रम किंवा सिनेमे बघणं आणि विशेष म्हणजे या सगळ्यात मळलेल्या सतरंजीचा अजिबात विचार न करणं, हे सगळं आपण हॉस्टेल सोडल्यानंतर करू शकू?

हॉस्टेलची मेस हा खरं तर चिडण्याचा आणि तक्रारीचा विषय पण आपली मेस मात्र आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मैत्रिणींबरोबर गप्पा-गोष्टी करत, सगळ्यांच्या घरच्या चटणी, लोणचं, तुपाची चव घेत केलेल्या जेवणाची सर इतर कुठल्याही ठिकाणच्या जेवणाला येईल?

या सगळ्याबरोबरच हॉस्टेलचं ऑफिस- तिथे जाताना मनात असलेली धाकधूक, मधुमालतीच्या वेलाजवळच्या खांबाला टेकून तासन्तास केलेला अभ्यास, पेपर वाचण्याचा बेंच- तिथे एकाच वर्तमानपत्राची पानं, दोन किंवा तीन मुलींनी एकाच वेळी वाचणं, हॉस्टेलच्या गेटसमोरचा सुख दुख्खांचा बेंच -तिथे बसून मोकळं केलेलं मन, अश्रूंना करून दिलेली वाट किंवा एकमेकींची गुपितं किंवा तक्रारी, जिन्यात बसून केलेली मस्ती खरंतर टवाळकी या सगळ्या आठवणी आपल्यासाठी अनमोलच आणि या छोट्या जगाचं महत्त्व आपल्यापुरतं तरी मोठंच.

जसं हॉस्टेलशी- या वास्तूशी आपलं नातं आत्मीय तसंच इथल्या माणसांशी सुद्धा. आपल्या मावश्या, त्याचं हक्कानं रागावणं, नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येत असूनही चाटून पुसून खाल्लेला मावशींच्या घरचा ठेचा आणि भाकरी, कुणाचातरी पाय मुरगळल्यावर मावशींनी दमदाटी करून लावलेलं तेल आणि दुसऱ्या दिवशी खरंच बरा झालेला पाय, एखाद्या मित्रासोबत पाहिल्यावर मावशींनी 'हे आमचे जावई का?' म्हणून चिडवणं, घरच्या आठवणीमुळे बारीक झालेल्या आपल्या चेहर्यामागचं कारण त्यांनी बरोबर ओळखणं, परीक्षेच्या दरम्यानच्या काळात चुकूनही आपण अभ्यासाखेरीज इतर काही करताना दिसलो तर त्याचं ओरडून अभ्यासाला बसवणं आणि भैय्याजींचं दिवसाच्या कुठल्याही वेळी, कोणत्याही कामासाठी अगदी ट्यूबलाईट बसवण्यापासून ते कुलूप फोडण्यापर्यंत उपलब्ध असणं हे 'फक्त' विद्यार्थिनी-कर्मचारी नात्यात शक्य आहे? यात व्यवहारापेक्षा आपलेपणाचा भाग अधिक नाही?

हॉस्टेलमधलं सगळ्यात महत्त्वाचं, मानाचं, अधिकाराचं आणि जबाबदारीचं स्थान रेक्टर madam किंवा सरांचं. आत्तापर्यंत आलेल्या रेक्टर्सचं आपल्याशी असलेलं नातं आपलेपणाचं नाही? आपल्याला बरं नसताना कितीतरी वेळा त्यांनी घरून पाठवून दिलेलं सूप किंवा मऊभात , कुठलं बक्षीस मिळाल्याचं कळल्यावर स्वतःच्या घरून त्यांनी आईबाबांना लावून दिलेला फोन, परीक्षेच्या काळात madam नी दिलेलं गरम गरम दूध आणि 'रूममध्ये झोप येत नसेल तर आमच्या घरी झोपायला चल' असं नुसतं सांगणं नाही तर प्रेमळ दटावणीच. कोणत्याही छोट्या यशाबद्दल त्यांनी दिलेलं बक्षीस, दरवर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी केलेलं औक्षण, रात्री अपरात्री कोणाला बरं नाहीसं झाल्यावर स्वतःची गाडी काढून त्याचं डॉक्टरांकडे नेणं, madam शी किंवा सरांशी कोणत्याही विषयावर हक्कानं केलेलं हितगुज हे सगळं आपल्याला सहजपणे विसरता येईल? आई/वडील- मुलगी या नात्याइतकंच हेही नातं श्रेष्ठ नाही?

... आणि 'आपण सगळ्याजणी'- कुठून कुठून येवून या वास्तूशी एकरूप झालेल्या. आपलं नातं तर खरंच अगम्य आहे. केवळ मैत्रीण, बहीण नाही तर 'आपल्या हॉस्टेलमधली मुलगी' हेच एक नातं नाही? आपण एकमेकींसाठी इतक्या अनोळखी, परक्या पण किती पटकन सामावून घेतो एकमेकींना. सुरुवातीला एकमेकींशी व्यावहारिक, वरवरचं बोलणार्या आपण पुढे जाऊन किती वैयक्तिक गोष्टी बोलतो एकमेकींशी? आपण एकत्र बसून खाल्लेला प्रत्येकीच्या घरचा खाऊ, आपले रात्र रात्र जमलेले गप्पांचे अड्डे, रात्री जागून प्यायलेली कॉफी, सहज म्हणून बोलत उभे राहिलो तरी निघून जाणारा एक तास, जेवणासाठी एकमेकींना सोबत म्हणून कितीही वेळ ताटकळणं एकमेकींना विनातक्रार केलेली कुठल्याही तऱ्हेची मदत, आजारपणात एकमेकींची घेतलेली काळजी, मधल्या अंगणात आपलं क्रिकेट किंवा लपाछपी खेळणं, आपले मतभेद, भांडणं, दंगा, शेजारच्या शाळेत सांगितल्या जाणाऱ्या सूचना पाठ झाल्यामुळे तिकडे सूचना सुरु झाल्यावर आपलं इकडे सूचना 'म्हणणं' आणि हे सगळं करताना आपण अनुभवलेली भरपूर धमाल, नवरात्रीच्या दिवसांत बाहेरच्या गाण्यांच्या आवाजाचा त्रास करून न घेता रूममध्येच खेळलेला गरबा,
हॉस्टेलमधल्या कार्यक्रमांना एकमेकींना नटवणं, साड्या नेसवून देणं, कार्यक्रमांत केलेली मजा शिवाय ओरडणं, किंचाळणं, खिदळणं, नाचणं इ. इ. इ..... हे आपलं एकमेकींशी असलेलं नातं आणि या आठवणी आपल्याला पुढच्या आयुष्यात नक्की साथ करतील.

'माझ्या' विचारांतून बाहेर पडून, 'आपल्या' आठवणींत कधी शिरले ते कळलंच नाही. हीच तर हॉस्टेलची खासियत आहे. हॉस्टेलशी नकळत जुळलेली नाळ सहजी संपूर्ण नाही कापून टाकता येणार,तिचे अवशेष राहणारच- आयुष्यभर साथ करत. आणि ते नसतील तर कदाचित अस्वस्थ, अपूर्ण वाटेल. म्हणून या हॉस्टेलच्या ऋणातून मुक्त होण्याचा वेडा मार्ग शोधण्यापेक्षा मी या प्रेमळ वस्तूच्या ऋणातच राहणं पसंत करीन आणि जपून ठेवीन मनात प्रतिमा- माझ्या सावत्र पण प्रेमळ घराची....