Monday, January 4, 2010

नातं हॉस्टेलशी..

(पुढे चालू..)

हॉस्टेलमधली आपली सर्वात आवडती जागा म्हणजे आपला टि.व्ही. हॉल. रविवारी सकाळी 'रंगोली' पाहण्यासाठी मुद्दामहून लावलेला गजर, न चुकता बघितलेलं रविवार दुपारचं 'छायागीत' आणि खूप झोप आली तरीही मन लावून बघितलेले शुक्रवार-शनिवारचे रात्रीचे सिनेमे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटच्या matches बघताना केकेली धमाल. एकेका रनसाठी सुद्धा दिलेले 'थ्री चीअर्स', आपला आवडता खेळाडू खेळायला आला कि 'तो आज नक्की शंभर रन्स करणार' अशी अनेक जणींनी वर्तवलेली भविष्य. एखादी मैत्रीण 'बाहेरून टि. व्ही. हॉल मध्ये येणं' हे विशिष्ट खेळाडूसाठी 'लकी' आहे असं आपणहूनच ठरवून तिला अनेकदा दारातून आत- बाहेर करायला लावण्याचा वेडेपणा, match संपल्यानंतर केलेला दंगमागे बसलेल्या मुलींना टि. व्ही. व्यवस्थित दिसत नाही म्हणून पुढच्या मुलींनी अवघडून वाकून बसणं किंवा एकमेकींच्या मांडीवर एक आड एक झोपून कार्यक्रम किंवा सिनेमे बघणं आणि विशेष म्हणजे या सगळ्यात मळलेल्या सतरंजीचा अजिबात विचार न करणं, हे सगळं आपण हॉस्टेल सोडल्यानंतर करू शकू?

हॉस्टेलची मेस हा खरं तर चिडण्याचा आणि तक्रारीचा विषय पण आपली मेस मात्र आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मैत्रिणींबरोबर गप्पा-गोष्टी करत, सगळ्यांच्या घरच्या चटणी, लोणचं, तुपाची चव घेत केलेल्या जेवणाची सर इतर कुठल्याही ठिकाणच्या जेवणाला येईल?

या सगळ्याबरोबरच हॉस्टेलचं ऑफिस- तिथे जाताना मनात असलेली धाकधूक, मधुमालतीच्या वेलाजवळच्या खांबाला टेकून तासन्तास केलेला अभ्यास, पेपर वाचण्याचा बेंच- तिथे एकाच वर्तमानपत्राची पानं, दोन किंवा तीन मुलींनी एकाच वेळी वाचणं, हॉस्टेलच्या गेटसमोरचा सुख दुख्खांचा बेंच -तिथे बसून मोकळं केलेलं मन, अश्रूंना करून दिलेली वाट किंवा एकमेकींची गुपितं किंवा तक्रारी, जिन्यात बसून केलेली मस्ती खरंतर टवाळकी या सगळ्या आठवणी आपल्यासाठी अनमोलच आणि या छोट्या जगाचं महत्त्व आपल्यापुरतं तरी मोठंच.

जसं हॉस्टेलशी- या वास्तूशी आपलं नातं आत्मीय तसंच इथल्या माणसांशी सुद्धा. आपल्या मावश्या, त्याचं हक्कानं रागावणं, नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येत असूनही चाटून पुसून खाल्लेला मावशींच्या घरचा ठेचा आणि भाकरी, कुणाचातरी पाय मुरगळल्यावर मावशींनी दमदाटी करून लावलेलं तेल आणि दुसऱ्या दिवशी खरंच बरा झालेला पाय, एखाद्या मित्रासोबत पाहिल्यावर मावशींनी 'हे आमचे जावई का?' म्हणून चिडवणं, घरच्या आठवणीमुळे बारीक झालेल्या आपल्या चेहर्यामागचं कारण त्यांनी बरोबर ओळखणं, परीक्षेच्या दरम्यानच्या काळात चुकूनही आपण अभ्यासाखेरीज इतर काही करताना दिसलो तर त्याचं ओरडून अभ्यासाला बसवणं आणि भैय्याजींचं दिवसाच्या कुठल्याही वेळी, कोणत्याही कामासाठी अगदी ट्यूबलाईट बसवण्यापासून ते कुलूप फोडण्यापर्यंत उपलब्ध असणं हे 'फक्त' विद्यार्थिनी-कर्मचारी नात्यात शक्य आहे? यात व्यवहारापेक्षा आपलेपणाचा भाग अधिक नाही?

हॉस्टेलमधलं सगळ्यात महत्त्वाचं, मानाचं, अधिकाराचं आणि जबाबदारीचं स्थान रेक्टर madam किंवा सरांचं. आत्तापर्यंत आलेल्या रेक्टर्सचं आपल्याशी असलेलं नातं आपलेपणाचं नाही? आपल्याला बरं नसताना कितीतरी वेळा त्यांनी घरून पाठवून दिलेलं सूप किंवा मऊभात , कुठलं बक्षीस मिळाल्याचं कळल्यावर स्वतःच्या घरून त्यांनी आईबाबांना लावून दिलेला फोन, परीक्षेच्या काळात madam नी दिलेलं गरम गरम दूध आणि 'रूममध्ये झोप येत नसेल तर आमच्या घरी झोपायला चल' असं नुसतं सांगणं नाही तर प्रेमळ दटावणीच. कोणत्याही छोट्या यशाबद्दल त्यांनी दिलेलं बक्षीस, दरवर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी केलेलं औक्षण, रात्री अपरात्री कोणाला बरं नाहीसं झाल्यावर स्वतःची गाडी काढून त्याचं डॉक्टरांकडे नेणं, madam शी किंवा सरांशी कोणत्याही विषयावर हक्कानं केलेलं हितगुज हे सगळं आपल्याला सहजपणे विसरता येईल? आई/वडील- मुलगी या नात्याइतकंच हेही नातं श्रेष्ठ नाही?

... आणि 'आपण सगळ्याजणी'- कुठून कुठून येवून या वास्तूशी एकरूप झालेल्या. आपलं नातं तर खरंच अगम्य आहे. केवळ मैत्रीण, बहीण नाही तर 'आपल्या हॉस्टेलमधली मुलगी' हेच एक नातं नाही? आपण एकमेकींसाठी इतक्या अनोळखी, परक्या पण किती पटकन सामावून घेतो एकमेकींना. सुरुवातीला एकमेकींशी व्यावहारिक, वरवरचं बोलणार्या आपण पुढे जाऊन किती वैयक्तिक गोष्टी बोलतो एकमेकींशी? आपण एकत्र बसून खाल्लेला प्रत्येकीच्या घरचा खाऊ, आपले रात्र रात्र जमलेले गप्पांचे अड्डे, रात्री जागून प्यायलेली कॉफी, सहज म्हणून बोलत उभे राहिलो तरी निघून जाणारा एक तास, जेवणासाठी एकमेकींना सोबत म्हणून कितीही वेळ ताटकळणं एकमेकींना विनातक्रार केलेली कुठल्याही तऱ्हेची मदत, आजारपणात एकमेकींची घेतलेली काळजी, मधल्या अंगणात आपलं क्रिकेट किंवा लपाछपी खेळणं, आपले मतभेद, भांडणं, दंगा, शेजारच्या शाळेत सांगितल्या जाणाऱ्या सूचना पाठ झाल्यामुळे तिकडे सूचना सुरु झाल्यावर आपलं इकडे सूचना 'म्हणणं' आणि हे सगळं करताना आपण अनुभवलेली भरपूर धमाल, नवरात्रीच्या दिवसांत बाहेरच्या गाण्यांच्या आवाजाचा त्रास करून न घेता रूममध्येच खेळलेला गरबा,
हॉस्टेलमधल्या कार्यक्रमांना एकमेकींना नटवणं, साड्या नेसवून देणं, कार्यक्रमांत केलेली मजा शिवाय ओरडणं, किंचाळणं, खिदळणं, नाचणं इ. इ. इ..... हे आपलं एकमेकींशी असलेलं नातं आणि या आठवणी आपल्याला पुढच्या आयुष्यात नक्की साथ करतील.

'माझ्या' विचारांतून बाहेर पडून, 'आपल्या' आठवणींत कधी शिरले ते कळलंच नाही. हीच तर हॉस्टेलची खासियत आहे. हॉस्टेलशी नकळत जुळलेली नाळ सहजी संपूर्ण नाही कापून टाकता येणार,तिचे अवशेष राहणारच- आयुष्यभर साथ करत. आणि ते नसतील तर कदाचित अस्वस्थ, अपूर्ण वाटेल. म्हणून या हॉस्टेलच्या ऋणातून मुक्त होण्याचा वेडा मार्ग शोधण्यापेक्षा मी या प्रेमळ वस्तूच्या ऋणातच राहणं पसंत करीन आणि जपून ठेवीन मनात प्रतिमा- माझ्या सावत्र पण प्रेमळ घराची....