Sunday, August 14, 2011

पुस्तकं

१. चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर

पुस्तकं, जंगल, चित्रकला या तीनही गोष्टींबद्दल आदर आणि आवड असल्यामुळे हे पुस्तक मला फारच आवडलं. खूप मोठे लेखक लहानपणीच का वाचले नाहीत याबद्दलची खंत आता वाटते, त्यात व्यंकटेश माडगूळकरांचं नाव अॅड झालं.

त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल (ज्यातली काही जंगल सफर, निसर्गाभ्यासावर आहेत), केलेल्या शिकारींबद्दल – नंतर मतपरिवर्तन झाल्यामुळे सोडलेल्या या छंदाबद्दल, पु. भा. भाव्यांसारख्या आवडत्या स्नेही कथाकाराबद्दल, परदेशातल्या चित्रांच्या-शिल्पांच्या संग्रहालयांबद्दल, व्हॅन गॉगच्या गावात, कर्मभूमीत गेल्याच्या अनुभवाबद्दल, तिथे विकत घेतलेल्या चित्रकलेच्या साहित्याच्या अप्रुपाबाबत, गावातल्या जुन्या-नव्या माणसांबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे.

खरी, मनापासूनची आणि देशी भाषा वाचून मला खूप छान वाटलं. आणि माडगूळकरांनी काढलेली स्केचेस पाहून यांनी चित्रकलेत अजून लक्ष घातलं असतं तर मला तेही एक पुस्तक घेता आलं असतं असं वाटलं.
२. एका खेळियाने.. – दिलीप प्रभावळकर

इतक्या विविध भूमिका का आणि कशा केल्या, ज्या भूमिका लिहिल्या, त्या का लिहिल्या, पूर्वी केलेली नाटकं, मालिका नंतरचे मराठी आणि हिंदीही चित्रपट, या सगळ्या कामांदरम्यान भेटलेली माणसं, आलेले अनुभव याबद्दल अत्यंत नेटकेपणाने कुठेही लिखाण भरकटू न देता केलेलं हे पुस्तक आहे.

‘चिमणरावाच चऱ्हाट’, ‘साळसूद’ या मालिकांबद्दलचे अनुभव वाचायला मला जास्त मजा वाटली कारण ‘साळसूद’ मी दूरदर्शनवर पूर्ण पाहिलेली आणि अतिशय आवडलेल्या मोजक्या मालिकांतली एक आहे आणि ‘चिमणराव’ संपूर्ण मालिका पाहिली नसली तरी (‘बालचित्रवाणी’मध्ये बहुधा) त्याचे काही भाग पाहिल्याचं आठवतंय.

मुळात लहानपणीच्या, केवळ दूरदर्शनच (तेही आईबाबांच्या परवानगीने) बघता येण्याच्या काळातल्या खूपशा आठवणी या पुस्तकाने जाग्या झाल्या. म्हणून या पुस्तकाचं महत्त्व वाटतं.

खेरीज दिलीप प्रभावळकरांचं नट आणि माणूस म्हणूनही श्रेष्ठत्व वाटत राहातं.

1 comment:

  1. तू पुन्हा ब्लॉग लिहायला चालू केलास हे पाहून आनंद वाटला / झाला...
    पूर्वी सारखच तू अप्रतिम लिहितेयस...

    ReplyDelete