Wednesday, December 23, 2009

नातं हॉस्टेलशी...

(मी कॉलेजची महत्त्वाची पाच वर्ष स. प. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहिले. त्या पाच वर्षात आलेले साधेसे अनुभव जे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत ते इथे मांडतेय. हा लेख हॉस्टेलमध्ये राहत असताना तिथल्या मैत्रिणींना उद्देशून लिहीलाय. त्यामुळे सगळीकडे 'आपलं, आपण' असे उल्लेख आहेत. जे हॉस्टेल मध्ये राहिलेत त्यांना असेच काहीसे अनुभव आले असतील कदाचित, जे राहिले नसतील त्यांना कधीतरी हॉस्टेल मध्ये राहावंसं वाटेल असं वाटतं..)


घरातून निघताना, 'हळू जा' म्हणताना आईने आणलेलं उसनं हसू, आजीने हळूच डोळ्याला लावलेला पदर, बाबांनी 'अच्छा' म्हणताना त्यांचा कसनुकसा झालेला चेहेरा, आठ तासांचा कंटाळवाणा प्रवास शिवाय पहाटे पुण्यात पोहोचल्यावर 'म्याडम रिटर्नचा यक्ष्ट्रा चार्ज पडेल' म्हणून रिक्षात बसण्याआधीपासूनच रिक्षावाल्याने आणलेला वात हे सगळं कॉलेजच्या मुख्य दारातून आत आल्यानंतर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि हॉस्टेलचं गेट बघितल्यानंतर नुसतं विसरायलाच होतं असं नाही तर हॉस्टेलच्या आत जाण्याची ओढ लागते. म्हटलं तर 'परक्या' अशा या वास्तूशी आपलं इतकं आत्मीय, आपलेपणाचं नातं निर्माण होऊ शकतं? पाच वर्षांच्या माझ्या अनुभवांवरून मी म्हणेन, 'नक्की होऊ शकतं'. हॉस्टेलचा फोटो काढून त्यावर कॉमेंट म्हणून 'माझा पुण्यातलं मोठ्ठ घर' असं लिहिताना माझा एकदाही कचरला नाही, मे महिन्यात एकदा रात्री संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकट, शब्दशः एकट झोपायची वेळ आल्यावर मला एक क्षणही भीती वाटली नाही. हे सगळं आपलेपणा वाटत नसता तर झालं असतं?

हॉस्टेल हि खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वैचित्र्यापूर्ण वास्तू आहे. आणि तिच्या प्रत्येक वैशिष्ट्याबरोबर आपलं एक घट्ट नातं आहे. आपल्या रूम्स- छोट्या असल्या तरीही आपल्या हक्काच्या, खूप पसारा करण्याची किंवा कदाचित खूप कलात्मक रित्या सामान लावण्याची परवानगी देणाऱ्या. आता पदव्युत्तर वर्गात येऊनही आपली F.Y . ची, ही S.Y. ची, T .Y. ची रूम बघताना हरखून जायला होतं. आम्ही बेड असा ठेवला होता, टेबलं अशी ठेवली होती हे रुमच्या पुढच्या वारसदारांना सांगताना आणि त्यांना ऐकताना किती मजा येते! जुनी रूम, नवे बदल विसरून क्षणात डोळ्यापुढे तरळते आणि त्याच्याबरोबर असंख्य आठवणी... सगळ्यात महत्त्वाचा आपल्या रुम्सचा रंग ज्यातून अजूनही कुठून कुठून जुना रंग आपला अस्तित्व दाखवतोच. 'आम्ही आलो त्या वर्षी हॉस्टेलला अमुक रंग होता' हे सांगताना पूर्वी केलेली भिंतीवरची कलाकुसर आठवते. एकमेकींवर केलेल्या आणि भिंतीवर मोठाल्या अक्षरात लिहिलेल्या छोट्या कविता, एकमेकींची चित्रं, एव्हढंच कशाला, आपल्या लाडक्या बेबोवर(आमच्या हॉस्टेल मधली कुत्री जी रोज नव्या नव्या कुत्र्यांबरोबर फिरायची) 'मोहोब्बते' च्या धर्तीवर केलेलं 'कुत्तोब्बते' हे महाकाव्य(?) सुद्धा हटकून आठवतं.

रूममधल्या कॉटची आणि टेबलांची तर आपापली अशी एक खासियत आहे. काही कॉट दोन्ही बाजूंनी उंच आणि मध्ये वाकलेल्या. काही आवाज करणाऱ्या तर काही शांत, गरीब अश्या. काही टेबलं हलणारी- कदाचित रुमच्या पातळीतल्या असमतोलामुळे किंवा काही खरोखरच चांगली. व्यवस्थित लागणारे किंवा न लागणारे ड्रॉवर्स, व्यवस्थित न लागणारे ड्रॉवर्स लावण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या ट्रिक्स- या सगळ्याची मजा काही औरच. दारांची गम्मत तर आणखीनच वेगळी, आधी एक दार थोडं जोरात पुढे ओढायचं मग दुसरं थोडं वर उचलल्यासारखं करून लावायचं, या आणि अश्या कितीतरी तऱ्हा. थोडक्यात काय तर प्रत्येक दाराची, रूमची स्वतंत्र अशी ओळख आहे.

हॉस्टेलमधली बाथरूम्स वगैरे तर आजन्म कंटाळवाणा आणि वादाचा विषय. कोणत्या बाथरूमचा नळ, बल्ब आणि 'अंतर्गत व्यवस्था' चांगली आहे हे वर्षाच्या सुरुवातीलाच हेरून ठेऊन वर्षभर त्याच बाथरूम मध्ये आंघोळ करणं, आंघोळीकरता सतत असणारी भलीमोठी रांग, एक बादली भरण्यासाठी पंधरा मिनिटांहून अधिक वेळ घेणारे गिझर्स, तुंबलेल्या किंवा तुंबणाऱ्या बाथरुम्सवर न रागावता उलट त्यावर केलेले विनोद किंवा चारोळ्या, एकाच दिवशी धुतलेले वीसहून अधिक कपडे हे सगळे अनुभव आणि आठवणी फक्त आणि फक्त हॉस्टेलमध्येच मिळू शकतात.
(क्रमशः)

Saturday, December 5, 2009

आनंद..

(खूप मित्र मैत्रिणी IT वगैरे क्षेत्रात काम करायला लागल्यापासून इतके बदलल्यासारखे वाटतायत की त्यांना बघून जे सुचलं ते लिहावसं वाटलं. यात नवीन काहीच नाही पण वाईट वाटलं ते शेअर करावंसं वाटलं इतकंच)

आजकाल एकूणच लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात कि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंदच वाटत नाही बहुदा. खूप काहीतरी प्रचंड वगैरे म्हणावा असा छान अनुभव आला तरच लोकं आनंदी होताना दिसतात. 'पैसे मिळवणं, साठवणं, अधिक पैसे मिळवणं, अधिकाधिक पैसे साठवणं या गोष्टीला इतका महत्त्वं देताना दिसतायत लोकं की कितीतरी साध्या गोष्टींमधला आनंद हरवत चाललाय.

जवळच्या माणसांना भेटून मिळणारा आनंद, सध्या गप्पांमधून मिळणारा आनंद, ट्रेकला जाताना- जाऊन आल्यावर त्या दमणुकीत येणारी मजा, सकाळी खिडकी उघडल्यावर उजेड आत आल्यावर- मोकळा रस्ता पाहिल्यावर येणारं छान फिलिंग, सुटीच्या दिवशी मोठ्ठा कप भरून सकाळी निवांत पेपर वाचत घेतलेला चहा, स्वीच ऑफ केल्यामुळे दिवसभरात एकदाही मोबाईल न वाजल्यामुळे वाटलेला निवांतपणा, कॉलेजमध्ये एका कठीण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे सरांनी खिशातलं काढून दिलेलं पेन मिळाल्यामुळे मोठ्ठ बक्षीस मिळालं असं वाटणं या आणि अशा सगळ्या अनुभवांमध्ये कितीतरी मजा असते खरं तर ती कधी लक्षात घेणार आपण?

भारत आर्थिक महासत्ता वगैरे बनणार असं म्हणतात जाणकार मग त्याची किंमत म्हणून आत्ता जे कमी प्रमाणात जाणवतंय ते मोठ्या प्रमाणात जाणवायला लागणार की काय?
काय माहित काय होणार ते? मला मात्र हे लिहून शेअर केल्यामुळे आनंद झालाय हे नक्की.. :)

Friday, December 4, 2009

अनुभव...

पुण्यात दिवसाच्या कोणत्याही वेळी बहुतांशी मोठ्या रस्त्यांवर गर्दी असते त्यातही सकाळची दहाची वेळ म्हणजे तर पुढे जाण्यासाठी लोकं शक्य तेव्हढ्या क्लुप्त्या शोधत असतात.

एक दिवस नेहमीप्रमाणेच रस्त्यावर गर्दी होती. स्कुटरवरून जाणारे एक काका खूप वेळ हॉर्न वाजवून थकले तरीही त्यांना पुढे जायला वाट मिळत नव्हती. कितीही हॉर्न वाजवला तरी रस्ता मोकळा झाल्याशिवाय वाहनांची रांग पुढे कशी सरकणार? ते काका पुढे जाण्यासाठी अगदीच अधीर होते. शेवटी न राहवून त्यांनी फुटपाथवरून स्कूटर चालवायला सुरुवात केली. इथे रस्त्यावरून गाडया चालवणं मुश्कील असताना फुटपाथवरून गाडी चालवणं म्हणजे खूपच कौशल्याच काम होतं. खूप वैतागत, चिडचिड करत ते साधारण दहा पावलं पुढे गेले तर तिथे एक शाळेतली मुलगी उभी होती. साधारण बावीस-तेवीस वर्षांची असेल. विशेष मुलांच्या शाळेचा युनिफॉर्म तिच्या अंगावर होता. ते काका तिच्यावर खेकसून म्हणाले, 'जरा सरक कि दिसत नाही का गाडी येतेय?' ती जागची ढिम्म हलली नाही. ते आणखी चिडून तसंच काहीबाही म्हणाले तर ती त्यांना 'गाडया खालून जातात' इतकंच म्हणाली. तिला धड बोलताही येत नव्हतं. त्या स्पष्ट बोलणाऱ्या काकांपेक्षा तिचे उच्चार अस्पष्ट होते पण विचार मात्र स्पष्ट होते असं मला वाटलं.


त्या काकांनी तशीच चरफडत गाडी फुटपाथवरून खाली घेतली आणि ते गर्दीत मिसळून गेले. ती मुलगी अजिबात विचलित न होता तिथेच शांतपणे उभी होती.