Wednesday, December 23, 2009

नातं हॉस्टेलशी...

(मी कॉलेजची महत्त्वाची पाच वर्ष स. प. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहिले. त्या पाच वर्षात आलेले साधेसे अनुभव जे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत ते इथे मांडतेय. हा लेख हॉस्टेलमध्ये राहत असताना तिथल्या मैत्रिणींना उद्देशून लिहीलाय. त्यामुळे सगळीकडे 'आपलं, आपण' असे उल्लेख आहेत. जे हॉस्टेल मध्ये राहिलेत त्यांना असेच काहीसे अनुभव आले असतील कदाचित, जे राहिले नसतील त्यांना कधीतरी हॉस्टेल मध्ये राहावंसं वाटेल असं वाटतं..)


घरातून निघताना, 'हळू जा' म्हणताना आईने आणलेलं उसनं हसू, आजीने हळूच डोळ्याला लावलेला पदर, बाबांनी 'अच्छा' म्हणताना त्यांचा कसनुकसा झालेला चेहेरा, आठ तासांचा कंटाळवाणा प्रवास शिवाय पहाटे पुण्यात पोहोचल्यावर 'म्याडम रिटर्नचा यक्ष्ट्रा चार्ज पडेल' म्हणून रिक्षात बसण्याआधीपासूनच रिक्षावाल्याने आणलेला वात हे सगळं कॉलेजच्या मुख्य दारातून आत आल्यानंतर हळूहळू कमी व्हायला लागतं आणि हॉस्टेलचं गेट बघितल्यानंतर नुसतं विसरायलाच होतं असं नाही तर हॉस्टेलच्या आत जाण्याची ओढ लागते. म्हटलं तर 'परक्या' अशा या वास्तूशी आपलं इतकं आत्मीय, आपलेपणाचं नातं निर्माण होऊ शकतं? पाच वर्षांच्या माझ्या अनुभवांवरून मी म्हणेन, 'नक्की होऊ शकतं'. हॉस्टेलचा फोटो काढून त्यावर कॉमेंट म्हणून 'माझा पुण्यातलं मोठ्ठ घर' असं लिहिताना माझा एकदाही कचरला नाही, मे महिन्यात एकदा रात्री संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकट, शब्दशः एकट झोपायची वेळ आल्यावर मला एक क्षणही भीती वाटली नाही. हे सगळं आपलेपणा वाटत नसता तर झालं असतं?

हॉस्टेल हि खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वैचित्र्यापूर्ण वास्तू आहे. आणि तिच्या प्रत्येक वैशिष्ट्याबरोबर आपलं एक घट्ट नातं आहे. आपल्या रूम्स- छोट्या असल्या तरीही आपल्या हक्काच्या, खूप पसारा करण्याची किंवा कदाचित खूप कलात्मक रित्या सामान लावण्याची परवानगी देणाऱ्या. आता पदव्युत्तर वर्गात येऊनही आपली F.Y . ची, ही S.Y. ची, T .Y. ची रूम बघताना हरखून जायला होतं. आम्ही बेड असा ठेवला होता, टेबलं अशी ठेवली होती हे रुमच्या पुढच्या वारसदारांना सांगताना आणि त्यांना ऐकताना किती मजा येते! जुनी रूम, नवे बदल विसरून क्षणात डोळ्यापुढे तरळते आणि त्याच्याबरोबर असंख्य आठवणी... सगळ्यात महत्त्वाचा आपल्या रुम्सचा रंग ज्यातून अजूनही कुठून कुठून जुना रंग आपला अस्तित्व दाखवतोच. 'आम्ही आलो त्या वर्षी हॉस्टेलला अमुक रंग होता' हे सांगताना पूर्वी केलेली भिंतीवरची कलाकुसर आठवते. एकमेकींवर केलेल्या आणि भिंतीवर मोठाल्या अक्षरात लिहिलेल्या छोट्या कविता, एकमेकींची चित्रं, एव्हढंच कशाला, आपल्या लाडक्या बेबोवर(आमच्या हॉस्टेल मधली कुत्री जी रोज नव्या नव्या कुत्र्यांबरोबर फिरायची) 'मोहोब्बते' च्या धर्तीवर केलेलं 'कुत्तोब्बते' हे महाकाव्य(?) सुद्धा हटकून आठवतं.

रूममधल्या कॉटची आणि टेबलांची तर आपापली अशी एक खासियत आहे. काही कॉट दोन्ही बाजूंनी उंच आणि मध्ये वाकलेल्या. काही आवाज करणाऱ्या तर काही शांत, गरीब अश्या. काही टेबलं हलणारी- कदाचित रुमच्या पातळीतल्या असमतोलामुळे किंवा काही खरोखरच चांगली. व्यवस्थित लागणारे किंवा न लागणारे ड्रॉवर्स, व्यवस्थित न लागणारे ड्रॉवर्स लावण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या ट्रिक्स- या सगळ्याची मजा काही औरच. दारांची गम्मत तर आणखीनच वेगळी, आधी एक दार थोडं जोरात पुढे ओढायचं मग दुसरं थोडं वर उचलल्यासारखं करून लावायचं, या आणि अश्या कितीतरी तऱ्हा. थोडक्यात काय तर प्रत्येक दाराची, रूमची स्वतंत्र अशी ओळख आहे.

हॉस्टेलमधली बाथरूम्स वगैरे तर आजन्म कंटाळवाणा आणि वादाचा विषय. कोणत्या बाथरूमचा नळ, बल्ब आणि 'अंतर्गत व्यवस्था' चांगली आहे हे वर्षाच्या सुरुवातीलाच हेरून ठेऊन वर्षभर त्याच बाथरूम मध्ये आंघोळ करणं, आंघोळीकरता सतत असणारी भलीमोठी रांग, एक बादली भरण्यासाठी पंधरा मिनिटांहून अधिक वेळ घेणारे गिझर्स, तुंबलेल्या किंवा तुंबणाऱ्या बाथरुम्सवर न रागावता उलट त्यावर केलेले विनोद किंवा चारोळ्या, एकाच दिवशी धुतलेले वीसहून अधिक कपडे हे सगळे अनुभव आणि आठवणी फक्त आणि फक्त हॉस्टेलमध्येच मिळू शकतात.
(क्रमशः)

Saturday, December 5, 2009

आनंद..

(खूप मित्र मैत्रिणी IT वगैरे क्षेत्रात काम करायला लागल्यापासून इतके बदलल्यासारखे वाटतायत की त्यांना बघून जे सुचलं ते लिहावसं वाटलं. यात नवीन काहीच नाही पण वाईट वाटलं ते शेअर करावंसं वाटलं इतकंच)

आजकाल एकूणच लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात कि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंदच वाटत नाही बहुदा. खूप काहीतरी प्रचंड वगैरे म्हणावा असा छान अनुभव आला तरच लोकं आनंदी होताना दिसतात. 'पैसे मिळवणं, साठवणं, अधिक पैसे मिळवणं, अधिकाधिक पैसे साठवणं या गोष्टीला इतका महत्त्वं देताना दिसतायत लोकं की कितीतरी साध्या गोष्टींमधला आनंद हरवत चाललाय.

जवळच्या माणसांना भेटून मिळणारा आनंद, सध्या गप्पांमधून मिळणारा आनंद, ट्रेकला जाताना- जाऊन आल्यावर त्या दमणुकीत येणारी मजा, सकाळी खिडकी उघडल्यावर उजेड आत आल्यावर- मोकळा रस्ता पाहिल्यावर येणारं छान फिलिंग, सुटीच्या दिवशी मोठ्ठा कप भरून सकाळी निवांत पेपर वाचत घेतलेला चहा, स्वीच ऑफ केल्यामुळे दिवसभरात एकदाही मोबाईल न वाजल्यामुळे वाटलेला निवांतपणा, कॉलेजमध्ये एका कठीण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे सरांनी खिशातलं काढून दिलेलं पेन मिळाल्यामुळे मोठ्ठ बक्षीस मिळालं असं वाटणं या आणि अशा सगळ्या अनुभवांमध्ये कितीतरी मजा असते खरं तर ती कधी लक्षात घेणार आपण?

भारत आर्थिक महासत्ता वगैरे बनणार असं म्हणतात जाणकार मग त्याची किंमत म्हणून आत्ता जे कमी प्रमाणात जाणवतंय ते मोठ्या प्रमाणात जाणवायला लागणार की काय?
काय माहित काय होणार ते? मला मात्र हे लिहून शेअर केल्यामुळे आनंद झालाय हे नक्की.. :)

Friday, December 4, 2009

अनुभव...

पुण्यात दिवसाच्या कोणत्याही वेळी बहुतांशी मोठ्या रस्त्यांवर गर्दी असते त्यातही सकाळची दहाची वेळ म्हणजे तर पुढे जाण्यासाठी लोकं शक्य तेव्हढ्या क्लुप्त्या शोधत असतात.

एक दिवस नेहमीप्रमाणेच रस्त्यावर गर्दी होती. स्कुटरवरून जाणारे एक काका खूप वेळ हॉर्न वाजवून थकले तरीही त्यांना पुढे जायला वाट मिळत नव्हती. कितीही हॉर्न वाजवला तरी रस्ता मोकळा झाल्याशिवाय वाहनांची रांग पुढे कशी सरकणार? ते काका पुढे जाण्यासाठी अगदीच अधीर होते. शेवटी न राहवून त्यांनी फुटपाथवरून स्कूटर चालवायला सुरुवात केली. इथे रस्त्यावरून गाडया चालवणं मुश्कील असताना फुटपाथवरून गाडी चालवणं म्हणजे खूपच कौशल्याच काम होतं. खूप वैतागत, चिडचिड करत ते साधारण दहा पावलं पुढे गेले तर तिथे एक शाळेतली मुलगी उभी होती. साधारण बावीस-तेवीस वर्षांची असेल. विशेष मुलांच्या शाळेचा युनिफॉर्म तिच्या अंगावर होता. ते काका तिच्यावर खेकसून म्हणाले, 'जरा सरक कि दिसत नाही का गाडी येतेय?' ती जागची ढिम्म हलली नाही. ते आणखी चिडून तसंच काहीबाही म्हणाले तर ती त्यांना 'गाडया खालून जातात' इतकंच म्हणाली. तिला धड बोलताही येत नव्हतं. त्या स्पष्ट बोलणाऱ्या काकांपेक्षा तिचे उच्चार अस्पष्ट होते पण विचार मात्र स्पष्ट होते असं मला वाटलं.


त्या काकांनी तशीच चरफडत गाडी फुटपाथवरून खाली घेतली आणि ते गर्दीत मिसळून गेले. ती मुलगी अजिबात विचलित न होता तिथेच शांतपणे उभी होती.

Monday, November 16, 2009

ताडोबा...

यावर्षीची दिवाळी कुठेतरी लांब जाऊनच साजरी करायची असं ठरवलं होतं. ताडोबाला जायचा पर्याय समोर आल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मित्र-मैत्रिणींना कळल्यावर 'वाघ काही दिसणार नाही त्यामुळे उंदीर मांजरांचे फोटो काढ' वगैरे सल्ले मिळाले होते. खरं तर ताडोबाला जाण्यामागाचा उद्देश्श वाघ बघणे असा नव्हता.

मला जंगलाचा वास खूप आवडतो. माणसांपासून लांब राहायला, एकांतात विचार करायला, निसर्गात नुसतं असायला, काहीही कारण नसताना दूरवर बघत बसायला मिळणं हे मला खूपच आनंददायक वाटत.

रेल्वे मधून रात्रभर प्रवास करण्यापासून ते 'व्याघ्र प्रकल्प' असलेल अभयारण्य बघण्यापर्यन्तचे अनेक अनुभव माझ्यासाठी नवीन होते.
ताडोबात जाऊन काय काय शिकले?- निसर्गाचा मुक्तपणा, स्वच्छंदीपणा, उदारता, भव्यता, शांतपणे दान देत राहणं.. प्राणी आणि पक्ष्याचं एकमेकांना काही त्रास न देता एकत्र राहणं.. तिथल्या माणसाचं निसर्गाप्रती असलेलं खरंखुरं प्रेम, जंगलावर प्रण्यांचाच हक्क आहे आणि आपण तिथे उपरे आहोत हि प्रामाणिक भावना.. आणि असं बरंच काही..

(काहीही अपेक्षा ठेवली नसतानाही वाघ दिसला तो अनुभव ग्रेट आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन.)

Friday, November 13, 2009

गंधच्या निमित्ताने...

मध्यंतरी सचिन कुंडलकरांचा 'गंध' सिनेमा पाहिला. एकूणच विषय, मांडणी, संवाद, दिग्दर्शन, कलाकार, त्यांची कामं आणि सर्वच दृष्टीने सिनेमा खूपच चांगला वाटला. यापूर्वी त्यांनी चेतन दातारांवर लिहिलेला लोकसत्तातला लेख आणि 'मिळून सार्याजणीच्या' दिवाळी अंकात सुमित्रा भावे यांच्यावर लिहिलेला लेख सोडता बाकी काहीच लिखाण वाचनात नव्हतं. अजूनही नाही.

'गंधची' तोंड भरून स्तुती ऐकून अवधूतने कुंडलकरांचं 'कोबाल्ट ब्लू' पुस्तक भेट दिलं. एका बैठकीत सहज वाचून होईल अशा आकाराचं ते पुस्तक आहे. सलग दोनदा वाचलं तरी नव्याने काही मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर, त्यांच्या नातेसंबंधांवर खूप विचार केला जाऊ शकतो असं वाटलं.

सरळसोट मध्यमवर्गीय आयुष्य जगताना फारशा उत्कट, सर्वांगानं जीवन जगणाऱ्या, प्रतिभासंपन्न, बेडर, संवेदनशील, मुक्त अशा व्यक्ती फारशा भेटत नाहीत. भेटल्या तरी त्या आपल्या जवळच्या वर्तुळातल्या असू शकतातच असं नाही तेव्हा पुस्तकातल्या, सिनेमातल्या व्यक्तिरेखा अशा दिसल्या तर मस्त वाटतं.

...आणि आता मी जुन्या आठवणी वगळून पुढे आठवण्यासाठी नव्यानेच काही अनुभव घ्यायला बघतेय ज्यात आधी वाचलेली पुस्तकही वाचायला नको वाटतं तर 'कोबाल्ट ब्लू' हा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव ठरलाय. ( तसं गौरी देशपांडे याचं कुठलंही पुस्तक असं मस्त वाटण्याचा अनुभव देतंच त्यामुळे तीही पुस्तकं हल्ली कायम सोबत असतात.)
आता असे मस्त आठवणीत ठेवावेतच असं वाटणारे अनुभव आले की लिहीन..

Friday, September 25, 2009

आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास...

लहानपणी खुपदा ह्या विषयावर निबंध लिहीलाय. तेव्हा काय लिहायचे ते नीटसं आठवत नाही.

पण मुंबईत राहत असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आजी-आजोबांकडे जाण्याचा प्रवास कायमच अविस्मरणीय असायचा. कदाचित त्याबद्दलच लिहिलं जात असेल.
नंतर शिक्षणासाठी पुण्यात रहायला लागल्यापासून कोणत्याही सुटीत होस्टेल मधून घरी जातानाचा रात्रीचा प्रवास सुद्धा अर्थातच आठवणीत राहायचा- बस मधे बसल्यापसूनच काय काय आठवणी येत रहायच्या.. रत्नागिरी जवळ यायला लागलं की सगळे जुने गंध, त्याच्याशी संबंधित आठवणी, मग आई, बाबा, आजी, आजोबांचे चेहेरे, बाबाना 'स्टँड़ वर न्यायला येऊ नका' असा सांगितलंय तरीही ते नक्कीच आलेले असणार हा विचार असं काही मनात असतानाच प्रवास संपायचा. मग परतीचा प्रवास सुद्धा काही ना काही कारणाने लक्षात राहायचाच. बस मधे लागलेला टुकार सिनेमा, कुणीतरी दिलेला त्रास किंवा पहाटे रिक्शा मिळेल की नाहीं?, होस्टेल च गेट उघडण्यासाठी वॉचमन काका उठतील की नाही? हे प्रश्न तर कायमच असायचे आणि झोप उडवायचे. या प्रवासांमध्ये सगळे पेंडिंग विचार पूर्ण करता यायचे. या सगळ्याची फार मजा वाटायची. पण कधी याच्याबद्दल लिहिलेलं मात्र नाही कारण फारस लिहिण्यासारखं काही वाटलंच नाही.

आता खरंच विचार केला तर केवळ निबंध लिहिण्यापुरता नाही तर खरोखरच आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास करण्याची संधी मिळाली. ३१ ऑगस्टला अचानक ऑफिसच काम निघालं आणि सरांबरोबर कार मधून मुंबईला जाता आलं. सरांसोबत जायला मिळणार या गोष्टीच अप्रूप होतच पण तीन तास मी कार मध्ये काय करणार असा प्रश्न मला पडला होता. कारण सर गाडीत वाचन करतात, खूप कामाचे फोन सुरु असतात हे सगळं मला माहिती होतं. सरांशी बर्याच गोष्टी बोलाव्यात अस वाटत होतं पण आपल्या प्रोब्लेम्स साठी सरांचा वेळ घ्यावा की नाही हा संभ्रम होता.

मग असंच बोलायला सुरुवात केली तर एरवी बोलायला अवघड विषयांवरसुद्धा खूप सहजपणे बोलू शकले. आत्महत्या करणं irrational का?, पुस्तकं, चाणक्य मंडल मध्ये चालणारे courses, मुंबईतला बकालपणा, माणसं, त्यांचे स्वभाव, मानसशास्त्र, UPSC ची परीक्षा, ती देणारे विद्यार्थी, राजकारण, चांगल्या माणसांनी राजकारणात जाण्याची गरज, समाज. आजकाल मुलांवर होणारे किंवा न होणारे संस्कार, आस्तिक आणि नास्तिक, देवाचं अस्तित्व आहे का? असेल तर कुठल्या स्वरुपात?, एकूणच शाळेच महत्त्व, योग शिक्षण, लेखक, सरांचे प्रशासनातले अनुभव, मॅक्डोनाल्ड्स, पिझ्झा-बर्गर, एकूणच आयुष्य, पुनर्जन्म, आणि असं काय काय विषयांवर सर काय काय सांगत होते आणि मी नुसतं ऐकत होते किंवा काही सुचलं तर बोलत होते. या सगळ्या संभाषणात कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. बर्याचशा अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळाली.

माझ्या कुवतीनुसार जेवढ घेता आलं तेवढ घेतलं, नाही कळलं ते परत विचारलं, शक्य झालं तेवढ लक्षात ठेवलं, क्वचित काही वेळा जे सुचलं ते बोलले, पण एकूणच जातानाचा आणि येतानाचा असे दोन्ही प्रवास आयुष्यभर तारखेसकट लक्षात राहतील असे झाले.

सिनेमाला जसा climax असतो तसा या प्रवासाचा climax सांगायचा तर परत पुण्याला पोहोचल्यावर सरांच्या घरी आधी गाडी थांबली नंतर driver काकांनी मला होस्टेलवर सोडलं. सरांच्या बिल्डिंगपाशी आलो तसं सरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला- त्या स्पर्शातून काय काय जाणवलं ते शब्दांत सांगणं केवळ अशक्य आहे. खूप कमी वेळा असतात आयुष्यात जेव्हा कुणीतरी काहीतरी आश्वासक करण्याची गरज वाटत असताना खरंच कुणाचीतरी एखादी कृती हवं ते सगळं देऊन जाते. माझ्या बाबतीत तसंच झालं. आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, पुढे अगदीच सगळा अंधार नाही असं जाणवलं.. एकूण काय तर खूप छान वाटत राहिलं आणि तेव्हा मिळालेली energy मी अजून वापरू शकतेय...

माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात great प्रवास.....

Thursday, April 16, 2009

प्रश्न.. प्रश्न आणि प्रश्न....

किती प्रश्न पडत असतात आपल्याला? त्यातल्या किती प्रश्नांची उत्तरं मिळतात?, मिळू शकतात? ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्यांचा पाठपुरावा का नाही करत आपण पुरेसा? आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ती कशी मिळतात?- आपण विचार करतो त्यातून? काहीबाही वाचतो त्यातून?, कुणाशी ठरवून बोलतो त्यातून?, ठरवून प्रयत्न करतो त्यातून?, आधीच्या स्वतःच्या अनुभवांचा आधार घेतो त्यातून की दुसर्यांचे ऐकलेले, पहीलेले अनुभव असतात त्यातून? यातल्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे बहुदा. थोड्याफार प्रमाणात हे सगळंच वापरतो आपण. एखाद्या वेळी 'युरेका' म्ह्टल्यासारखं उत्तर समोर दिसतं - कुणाच्या बोलण्यातून, कृतीतून किंवा पुस्तकातून. अनेकदा जुन्या- न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं अनापेक्षितारित्या मिळतात. मग तो प्रश्नं सुटला म्हणताना त्या निमित्तानं आणखी प्रश्न पुढे येतात आणि येतच रहातात- चक्र असल्यासारखे न थांबता..

जे प्रश्न सुटत नाहीत त्यांचं काय करतो आपण? करतो का पाठपुरावा? नवा, अधिक महत्त्वाचा किंवा कदाचित अधिक अवघड प्रश्न समोर आला की जुन्या प्रश्नाकडे थोडं दुर्लक्ष होणं गृहीतच आहे का? मग त्या अनुत्तरित प्रश्नांच काय? 'प्रश्न पडणं ही केवळ एक घटना आहे का? - खरं तर नाही म्हणजे प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ 'घटना' याच्यापुरता मर्यादित नसावा. मग आपण झगडत का नाही उत्तर शोधायला? कदाचित आधीच्या बर्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली तर पुढे पड़णार्या प्रश्नांची संख्या कमी होऊ शकेल का? आणि आपल्या विकासासाठी प्रश्नांची उत्तरं मिळणं किंवा शोधून काढणं आवश्यक नाही का?

प्रश्न सोडवायचा म्हटला की चर्चा आली, वाद आले, मतभिन्नता आली कदाचित भांड़णं मग भांड़णंही विकोपाला जाणं. सगळं नीट सान्धता आलं तर ठीक पण नाही जमलं तर ताटातूट, तणाव, मनस्ताप असं काही बाही. खरं तर या फार टोकाच्या गोष्टी झाल्या पण मुळात किती व्यक्ती प्रश्न सोड़वण्यासाठी चर्चा करायला तयार असतात? त्यातून उद्भवलेच वाद किंवा अगदी भांड़णं सुद्धा तरी त्यालाही तयार असतात? वादविवाद, भांड़णं नकोत म्हणून एकाचं कुणाचंतरी ऐकण्याकडे किती कल असतो आपला? आणि मग त्या एकाचं ऐकता ऐकता तोच नियम बनतो. रीत, रुढी अशाच बनतात का? आणि मग असे काही प्रश्न पडले एखाद्याला- चकोरीला सोडून असलेले तर मग त्या प्रश्नांचं काय? त्या प्रश्नांना देतात का कुणी महत्त्वं? ते प्रश्नं सोडवण्याचा करतं का प्रयत्नं? त्या चाकोरीबाहेरचे प्रश्न पड़णार्या माणसाचं काय होतं आणि? त्याला चकोरीतलीच, चकोरीला धरून असलेली उत्तरं मिळाली आणि त्याने ती स्वीकारली तर विशेष काही फरक पडत नसेल बहुदा पण चकोरीला सोडून असलेलं उत्तर निवड़लं तर काय होतं? कुणाची सोबत राहाते का शिल्लक त्याला? किमान समाधान तरी असतं का त्याला- आपल्याला उत्तर मिळालं त्याचं की हळहळ असते मनात- चाकोरीबाहेरचं उत्तर स्वीकारण्याची मोठी किंमत द्यावी लागली त्याबद्दलची?

ज्यांना प्रश्नांची उत्तरं मिळवणं खूप महत्त्वाचं वाटतं, चाकोरीला सोडून असेल तरीही उत्तर मिळवण्याकडे ज्यांचा कल असतो त्यांना या उत्तरांची बरीच किंमत द्यावी लागत असेल का आयुष्यात? मग त्यांनी उत्तर मिळवण्याकडे कल ठेवायचा की बाकीच्या गोष्टी साम्भाळायच्या?, किंमत कमी द्यायला लागेल असं बघायचं?

एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कसं ठरवणार हे योग्य उत्तर आहे ते? योग्य उत्तराचे निकष कोणते? हे निकष फारच व्यक्तीसापेक्ष असणं शक्य आहे. जेव्हा स्वतःपुरते प्रश्न सोडवायचे असतील तेव्हा हे निकष वापरणं शक्य आहे पण जेव्हा स्वतःखेरीज अन्य कोणी त्याच्याशी सम्बंधित असतील तेव्हा कोणते निकष वापरायचे? आपण जे निकष वापरतोय त्यामुळे सम्बंधित कुणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करतो का आपण?

किती प्रश्न आहेत मला... कधी शोधणार मी त्याची उत्तरं? बघू निदान शक्य तितके प्रयत्न करून उत्तरं शोधायला हवीत हा विचार तरी मनात आला... हेही नसे थोडके.

Friday, April 10, 2009

बाईंचं घर

मी पहिली- दुसरीत असेन. काका म्हणाले, "तुझ्या बाईंच्या घरी यायचय का?'' बाईंचा मुलगा काकांचा मित्र आहे ते माहिती होतं पण कधी त्यांच्या घरी वगैरे जाणं होईल अस मनातही नव्हत आल. मी अर्थातच 'हो' म्हणाले.

असलेल्या फ्रॉक मधला सर्वांत चांगला फ्रॉक घालून काकांसोबत बाईंच्या घरी जायला निघाले. नुसत्या शाळेतल्या बाई नाही, वर्गशिक्षिका नाही चक्क मुख्याध्यापिका बाईंच्या घरी जाणं म्हणजे ग्रेटच गोष्टं होती- निदान ९०-९१ सालात, मराठी शाळेत पहिलीत शिकाणार्या मुलीसाठी तर नक्कीच होती.

आम्ही गिरगावातून चालत निघालो. काका नेत होते तो रस्ता चौपाटीला जाणारा होता.- ' म्हणजे बाई चौपाटीच्या जवळ रहातात? किती मज्जा येत असेल त्यांना रोज समुद्र बघताना? ' असे काय काय विचार मनात चालू असतानाच आम्ही एका बिल्डिंगमध्ये शिरलो. खूप उंच बिल्डिंग होती. आमच्या दोन मजली चाळीपेक्षा तर खूपच उंच. आम्ही लिफ्टपाशी गेलो. बाईंच्या बिल्डिंगमधली लिफ्ट खूपच भारी होती. आवाज न करता आपोआप सरकणारे स्टीलचे दरवाजे असणारी. आणि आपण सांगू त्या मजल्यावर न्यायला आत एक दादा पण होता. माझ्या ओळखीत फक्तं बापू आजोबांच्या बिल्डिंगमध्येच लिफ्ट होती- ती पण आवाज करणारे लोखंडी दरवाजे असणारी . त्याच्यापेक्षा ही लिफ्ट खूपच छान होती. काकांनी 'सिक्स्थ फ्लोअर' अस त्या दादाला सांगितलं आणि लिफ्ट सुरु झाली हे कळायच्या आतच आम्ही सहाव्या मजल्यावर जाऊन पोहोचलो.

व्हरान्डयातून उजवीकडे वळल्यावर बाईंचं घर होतं. दरवाज्याच्या पाटीवर दोन नावं होती पण ती इंग्रजीतून असल्यामुळे नक्की कुणाची होती ते कळलं नाही. बाईंच्या घराला दोन दारं होती. काकांनी बेल वाजवली. बाईंनीच दार उघडलं आणि खूप छान हसून 'या आत' म्हणाल्या. दाराजवळच्या कोपरय़ात आम्ही चपला काढल्या. बाई, 'बसा हा, मी आले' असं म्हणून आत गेल्या. बाईंच्या घराचा हॉल खूपच मोठा होता आणि खाली पायांना मस्त मऊ मऊ लागणारा गालिचा होता-आई हळकुंकवाच्या वेळी खूप बायका यायच्या तेव्हा घालायची त्याच्या पेक्षा हा गालिचा खूपच मऊ होता. सोफा पण बसल्यावर एकदम आत जाणारा होता. मी एकदम शहाण्या मुलीसारखी शांत बसले होते. तेवढ्यात बाई पाणी घेउन बाहेर आल्या. एक छान ट्रे मधून दोन काचेच्या ग्लासातून पाणी आणलं होत. मला म्हणाल्या- 'हळू पी हां'. फ्रिज मधलं थंडगार पाणी होतं . फ्रिज मधलं पाणी प्यायलं तर आई ओरडेल हा विचार मी झटकून टाकला आणि काकांचं बघून अर्धाच ग्लास पाणी पिऊन ग्लास नीट आवाज न करता समोरच्या काचेच्या टी-पॉय वर ठेवला. मग बाई आणि काका मला न कळणार्या अवघड विषयांवर गप्पा मारायला लागले-कसल्यातरी बैँक, राजकारण वगैरे विषयांवर. मला बरंच झालं- शांतपणे बाईंचं घर बघून घेता आलं. बाईंच्या घरी मोठ्ठा टिव्ही होता आणि त्याच्या शेजारी रिमोट पण ठेवला होता. ज्या छोट्या काचेच्या कपाटात टिव्ही ठेवला होता त्याच्यातच एक टेप रेकॉर्डर होता- त्याला सीडी प्लेअर म्हणतात असं मला खूप उशिरा कळलं. खूप कमी आवाजात काहीतरी इंग्रजी गाणी लागली होती. शब्द तर कळतच नव्हते पण आईबाबा मला छायागीत पण बघू देत नाहीत तर बाईंकडे इंग्रजी गाणी कशी काय चालतात? हा प्रश्नं काही सुटेना पण बाई ऐकतायत म्हणजे ते नक्कीच वाईट नसणार असं मात्र वाटलं.

बाईंच्या घराचा रंग पण वेगळाच होता. खूप प्रसन्न असा. छताला दोन झुम्बरं पण होती. भिंतीवर कसली कसली चित्र होती- वेडयावाकड्या आकारांची- अर्थ न कळणारी पण दिसायला छान दिसणारी. कोपर्यातल्या एका कोरलेल्या स्टुलावर फुलांचा गुच्छ ठेवलेला पारदर्शी ग्लास होता. टीपॉयच्या खालच्या कप्प्यात बाबा फक्त रविवारी आणायचे तसला इंग्रजी पेपर आणि कुठलीतरी इंग्रजी मासिकं होती. भिंतीवरच्या कपाटात वेगवेगळी पुस्तकं होती. माझं कधीपसूनचं स्वप्नं होतं- घरातसुद्धा मावणार नाहीत एवढी पुस्तकं विकत घेण्याचं. बाईंकडे निदान एक कपाट भरेल इतकी तरी पुस्तकं आहेत- मला त्यतलं एखादं सोपं पुस्तक देऊन- 'वाचून परत आणून दे ' म्हणतील का? अशा विचारात मी असतानाच बाईंचं आणि काकांचं बोलणं संपलं, काकांनी एक फाइल बाईंकड़े दिली आणि त्यांच्या मुलाला द्यायला सांगितली आणि आम्ही जायला निघालो. बाई हसून 'ये हा उद्या शाळेत' म्हणाल्या. आम्ही घरी आलो. पुढचे कितीतरी दिवस 'बाईंचं घर' हा विषय आम्हाला मधल्या सुटीत डबा खाताना पुरला.

.......


परवा माझे पाच-सहा विद्यार्थी घरी आले होते- 'ताई तुझं घर बघयचय' म्हणत. सगळी कॉलेजच्या पहिल्या-दुसर्या वर्षात शिकणारी मुलं. घरी आल्यापासून 'तू दारावरची पाटी मुद्दामहून मराठीत ठेवलीयेस का? ही चिनीमातीची विंड बेल कुणी दिली? हा फोटो कुणी काढला? तुझा भाऊ एवढे छान फोटो काढतो? ए, हा पेन स्टैंड तू बनवलायस? तुझं DVD's collection किती छान आहे..! तू इराणी वगैरे सिनेमे पण बघतेस?' हे आणि असे कितीतरी प्रश्नं विचारून त्यांनी मला भंडावून सोडलं. या प्रश्नान्मधून डोकावणारी त्यांची 'ताईचं घर' बघण्याची उत्सुकता, कुतूहल, नविन गोष्टिन्चं अप्रूप, आपल्यात आणि ताईच्यात कही साधर्म्य आहे का ते शोधण्याची धडपड आणि वेगळेपण असेल तर ते काय आणि ते कमीतकमी असावं अशी त्यांची इच्छा वगैरे जाणवली आणि मी पाहिलेलं 'बाईंचं घर' इतक्या वर्षानंतरही लख्खपणे समोर आलं. तेव्हा मी खूपच बुजरी होते. या मुलांइतकी धीट नव्हते. ही सगळी माझ्यापेक्षा खूपच धीटपणे आणि मोकळेपणाने वावरतायत. तेव्हाच्या माझ्यातला आणि आजच्या यांच्यातला एवढा फरक सोडला तर त्यांची उत्सुकता तर तीच आहे... मला आश्चर्य वाटलं आणि समाधानही.. काळ बदलला तरी कही गोष्टी बदलत नाहीत हेच खरं....

Friday, April 3, 2009

प्रिय डायरी

अगं,आज गुरुपौर्णिमा आहे. आमच्या होस्टेल मधे पण गुरुपौणिँमेचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. चारच दिवसांपूर्वी एक कल्पना पुढे आली होती की गुरुपौणिँमेच्या दिवशी केवळ 'गुरूजी, बाई' या अर्थी नाही तर 'एकूणच आयुष्यात ज्या ज्या कशापासून आपण शिकतो' आशा विस्तृत अर्थानं 'गुरु' या संकल्पनेबद्दल बोलायचं. मला 'नाती- आपले गुरु' हा विषय छान वाटला बोलायला. नंतर विचार करताना लक्षात आलंकी आजूबाजूची माणसं, त्यांच्याशी असलेलं आपलं नातं, सम्बंधित अनुभव विश्व यातून आपण शिकत असतो, घडत असतो, समृद्ध होत असतो तरीही आपण नाती/ नातेसंबंध याबाबत फरसा विचार नाही केलेला.

' नातं' म्हणजे नक्की काय? केवळ सम्बन्ध- परंपरेने येणारे/ रक्ताचे? म्हणजे आई-वडीलांचे भाऊ-बहिणी, काका, मामा, आत्या, स्वतःची भावंडे असे? पण अशी अगदी रक्ताची नाती पाण्याहूनही पातळ झालेली आपण पहातोच की.
अशी नाती तुटतात आणि पुन्हा जुळतच नाहीत. म्हणजे मग रक्ताच्या नात्यांना काही अर्थ उरतो का? मग एखाद्याच्या भावनेची जाण/ समज म्हणजे नातं का? - एकमेकांना समजुन घेउन त्या त्या व्यक्तिसन्दर्भात त्याच्या कलानुसार वागणं, वगावसं वाटणं म्हणजे नातं निर्माण होणं का? की फक्त 'ओळख' हेही एक नातं असतं आणि पुढे ते समृद्ध होत जातं? छोट्या ओळखीतून हळूहळू त्या माणसाचीच एकूण ओळख पटत जाते, ती आपल्याला हवीहवीशी वाटते आणि आपण नातं जोडायचा प्रयत्न करतो. अर्थात एकतर्फी पटलेली ओळख हे नातं असतं का? हा प्रश्नच आहे.

आपण तरी किती नात्यांमधे गुरफटलेले असतो ना? औपचारिक स्वरुपाची तर काही अनौपचारिक, काही आनंद देणारी, काही दुःखदायक, रागालोभाची, प्रेमाची, काही समजून घेणारी, काही समजून घ्यायला लावणारी अशी कितीतरी. काही नकोशी वाटणारी पण काही तर अशीही की जी आपल्या आयुष्यातनं कमी केली तर बाकी फारशी उरत नहीं. विश्वास, मोकळेपणा, सामंजस्य, मैत्रीभाव, आपलेपणा, प्रेम यावर आधारलेली किंवा यामुळे निर्माण झालेली नाती टिकतात, हवीहवीशी वाटतात, आवश्यकच असतात आणि आपल्याला खूप काही शिकवतात अर्थात गैरसमज, संकुचितपणा- वागण्यातला, विचारांचा; राग, द्वेष, मत्सर अशा अनेक कारणाने तुटलेली किंवा मुळातच जुळू न शकलेली नाती सुद्धा बरीच शिकवण देतात हेही खरंच.

कोणत्याही आदर्श नात्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतील, वाद होत असतील पण भांडणं होत नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मोकळेपणाने सांगता येतं आणि दूसरा त्याचा राग मानत नाही, खोटेपणा तर मुळीच नसतो. समोरच्या व्यक्तीचा धाक वाटत असेल कदाचित पण भीती नसते. काटेकोर व्यवहार असू शकतो पण प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा हे सगळं असतच.समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांचं ओझं वाटत नाही उलट त्याला अपेक्षपूर्तीचं समाधान देताना आनंद वाटतो. आणि कधी या अपेक्षा पूर्ण करता न येणार्या, त्रासदायक वाटल्याच तर तसं स्पष्टपणे सांगण्याचं आणि ऐकून घेण्याचं धैर्य दोघांमधेही असतं. परस्पर सामंजस्य असतं, एकमेकांबांबत empathy असते, दुसर्याचे आनंदाचे, दुःखाचे, संतापाचे, उत्कटतेचे क्षण आपणही तितक्याच समरसतेने अनुभवू शकतो, त्याच्या प्रत्येक 'मूड' मध्ये सहभागी होवू शकतो. चूका करत असेल तर समजावू शकतो पण चूका करण्याची, त्यातून स्वतः , शिकण्याची, सुधारण्याची, अधिक चांगलं काम करण्याची मुभाही देऊ शकतो. चांगल्या नात्यामध्ये दोघंही एकमेकांचा, एकमेकांच्या आवड़ीनिवडींचा, तत्त्वांचा, विचारांचा, आदर्शांचा मान ठेवतात, दुसर्या व्यक्तीला ती जशी आहे तसं स्वीकारतात. एकमेकाना साम्भाळूनघेतात. एकमेकाना समजुन घ्यायला, संवाद साधायला शब्दांची भलीमोठी जाळी विणावी लागत नाहीत. केवल शान्तपणा, मूक सम्भाषणही पुरेसं होतं.

आपल्याला समृद्ध, प्रगल्भ करण्यात ही सगळी नाती खूप महत्त्वाची भूमिका वठवतात. नाती आपल्याला शिकवतातच की, कसं वागावं आणि कसं वागू नये ते. अर्थात प्रत्येक जुळलेल्या वा तुटलेल्या किंवा जुळण्याच्या प्रक्रियेत असणार्या नात्यामधून काही न काही शिकून ते पुढच्या आयुष्यात वापरण्याचा काम तर आपणच करायला हवं. अजाणतेपणी तर ते होत असतच पण जणीवपूर्वकही करायला हवं. आणि माझ्या बाबतीत, खरं तर होस्टेल मधल्या कुठल्याही मुलीच्या बाबतीत हे खरं आहे की आपल्या घरापासून, आपल्या माणसांपासून दूर राहाण्याची किम्मत द्यावी लागली तरीही आतल्या, घट्ट नात्यांचा शोध घेणं किती सोपं होतं ग. तुझं- माझं तरी कसं नातं की तुझा माझ्या खासगी आयुष्यात पण मुक्त संचार. आपलं हे गोड नातं असंच टिकवून ठेवू, अर्थातच माझ्या....

Thursday, April 2, 2009

सुरुवात

अवधूत म्हणाला तुला जे लिहवस वाटत त्यासाठी ब्लॉग हा चांगला पर्याय आहे. मी technophobic आहे पण तरीही ब्लॉग हा जरा सोपा पर्याय आहे अस मलाही वाटतय आता. प्रश्न फक्त मराठी फॉण्टचा आहे पण तो लवकरच सोडवेन मी.