मध्यंतरी एकदा मला अचानक 'संकल्पाचं बळ' या विषयावर बोलावं लागलं. 'बोलावं लागलं' म्हणजे मला इच्छा नव्हती बोलायची पण 'पार्ट ऑफ माय ड्युटी' म्हणून करावं लागणार होतं. एकतर मला अशा अवघड नावं असलेल्या विषयांवर, औपचारिक असं फारसं बोलता येत नाही. समोर बरीच माणसं काहीतरी चांगलं, महत्वाचं ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनी बसलेली असताना आपण मात्र जाऊन आपल्या थोटक्या अनुभवानिशी, फारसा आवाका नसलेलं काहीतरी बोलून यायचं हे मला अन्यायकारकच वाटतं. पण बोलायलाच लागणार म्हटल्यावर ठरवलं की 'आपण काही संकल्प केले असतील आयुष्यात त्याबद्दलच बोलावं'.
मला वाटतं- 'संकल्प म्हणजे, आपण जे काही ठरवतो आयुष्यात- कोणत्याही परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं, कसं करायचं ते असावं'. बरेचदा आपण आपले संकल्प शब्दांत मांडत नाही. अनेकदा तशी गरजच पडलेली नसते किंवा त्याबद्दल विचार केलेला नसतो किंवा असे काही संकल्प वगैरे असतात असं मुळात अनेकांना वाटतंच नाही (आणि बरेचदा दुसर्याचे संकल्प ही खिल्ली उडवण्याची गोष्ट असते.)
तर मी विचार करत होते कि माझे काय संकल्प होते किंवा आहेत आयुष्यात? मी केव्हा शब्दांत मांडले माझे संकल्प? नीटसं
आठवत नाही पण आई-बाबा, शाळेतले शिक्षक यांनी जे सांगितलं, शिकवलं ते सतत घोकून, तसंच वागायचा प्रयत्न करताना असेल किंवा थोडेथोडे स्वतःचे विचार करायला जमायला लागलं- कुठलीही गोष्टं स्वतःच्या निकषांवर पडताळून पाहायला हवी असं वाटायला लागलं तेव्हापासून असेल, नक्की कधी ते आठवत नाही.
नेहमीचं शांत, निवांत आयुष्य सुरु असताना संकल्पाचं, ते शब्दांत मांडण्याचं, त्याबद्दल विचार करण्याचं महत्त्वं बहुदा वाटत नाही पण जेव्हा कठीण, अनपेक्षित परिस्थितीला किंवा संकटाला तोंड द्यावं लागतं तेव्हा हे महत्त्वं पटतं.
मला आनंदात, उत्साहात, मुक्तपणे राहायला आवडतं. अंगावर घेतलेलं काम नेटानी पूर्ण करायला आवडतं. प्रामाणिक असायला आवडतं आणि असंच काहीबाही.. तर असं सगळं- शहाण्यासारखं सुरळीत आयुष्य सुरु असताना खूप सोपं होतं पण आता जरा वेगळ्या वळणांनी चाललंय आयुष्य तर ह्या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी पाळणं कष्टाचं वाटतंय. तरीही शब्दांत नीट मांडलेले संकल्प मदतीला येतात असंही जाणवतंय.
हे सगळं का लिहीलं मी आत्ता तर- अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पाहतेय सध्या स्वतःबद्दल त्यात हेही तपासू म्हटलं आणि तपासताना लिहावंसं वाटलं इतकंच.